एएमसी मिरर : नगर
विरोधकांनी सत्तेत असतांना 15 वर्षे केवळ भूलथापा मारल्या. सामान्य माणसाला नागवले. शेतकर्यांना नागवले. लोकशाही त्यांच्या लक्षात येत नाही. प्रेमाने मते मागितली तर मिळतात. तुम्ही धमक्या दिल्या तरी उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. निवडून दिले नाही, तर उस घेणार नाही म्हणत असतील, तर सरकार आपले आहे, चिंता करु नका, नवीन कारखाना उभा करु, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांवर हल्ला चढविला आहे. उस शेतकर्याचा आहे, तुमच्या बापाचा नाही. शेतकर्याला नागवले तर शेतकरी तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीत धमकीला जागा नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार सुरेश धस, माजी मंत्री बबनराव पाचपुते, दौलत नाना शितोळे, अशोक खेडकर, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, साधना कदम, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, राजेंद्र दळवी, रवींद्र कोठारी, सुनिल साळवे, दिपक शहाणे, शांतिलाल कोपनर, राजेंद्र भैया देशमुख, प्रतिभा भैलुमे, अल्लाउद्दीन काझी, धनराज कोपनर, कांतिलाल घोडके, श्रीधर पवार, प्रकाश काका शिंदे, सुनिता खेडकर, नागनाथ जाधव, बंडा मोरे, शिवाजी अनभूले, ड बाळासाहेब शिंदे, चेअरमन गणेश पालवे आदी उपस्थित होते.
कारखान्याला उस घालायचा असेल तर मतं द्या, असे विरोधक म्हणत असल्याचे राम शिंदे यांनी भाषणात म्हटले होते. त्याचा धागा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कारखान्याने शेतकर्यांचा ऊस नाही घेतला, तर नवीन कारखाना उभारू, अशा शब्दांत शेतकर्यांना नवीन कारखाना उभारण्याचे आश्वासन दिले.विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. समोर कुणी विरोधक दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीत मजा येत नाही. निवडणुकीचा निकाल आता लहान मुलालाही माहिती आहे. आमचा पहिलवान रामभाऊ लालमाती लावून गोद्यात उतरलाय. विरोधकांना आपला पराभव दिसला आहे. त्यामुळेच राहुल गांधी बँकॉकला गेलेत. पवार साहेबांची अवस्था ‘आधे इधर जाओ, आधे इधर आओ’ अशी झालीय, असे ते म्हणाले. विदर्भात शरद पवार यांनी नागपूरच्या गुन्हेगारीवरुन मुख्यमंत्र्यांवर निषाणा साधला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. केवढी आमची दहशत झालीय, माझ्या सारख्या साधारण नागपूरकराने यांना एवढे जेरीस आणलेय, की यांना सगळे नागपूरकर गुंड दिसायला लागलेत. पहिल्यांदा राज्यात पवारांची अशी अवस्था तुमच्या आशीर्वादामुळे झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मावळमध्ये नागरिकांनी हिंमत दाखविली आणि पार्थबाबूला घरी पावठले. तशी हिंमत कर्जत-जामखेडकरांनी दाखवावी. रोहित बाबूंचे पार्सल तुम्ही घरी पाठवणार असा विश्वास आहे. राम शिंदे हे मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आहेत. समोर कितीही मोठा पहिलवान असला तरी त्याला चितपट केल्याशिवाय ते सोडणार नाहीत. सामान्य मुलगा मंत्री पदावर पोहचला आहे. लोकांनी त्यांचा नेता स्वतः तयार केला आहे. इतर लोकं तुमच्यावर नेतृत्व थोपविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, थोपलेलं नेतृत्व लोकं स्वीकारत नाहीत, असेही ते म्हणाले.
सरकारच्या कामाची माहिती देतांना मागील पाच वर्षात प्रत्येकाच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन व्हावे म्हणून सरकारने काम केल्याचे त्यांनी सांगितले. सरकार शेतकर्याच्या पाठिशी उभे राहिले. कर्जमाफी, दुष्काळासाठी निधी दिला. पिकविम्याचे पैसे दिले. मोदी साहेबांनी एफआरपीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आठ हजार कोटींचे पॅकेज साखर उद्योगाला दिले. विरोधकांचा जाहीरनामा पाहिला तर त्यांनाही पराभवाची खात्री झाल्याचे दिसते. प्रत्येकाला ताजमहाल आणि चंद्रावर प्रत्येकाला प्लॉट एवढे सोडून बाकी अनेक आश्वासन दिली आहे. त्यांनाही माहिती आहे, आपण पुढचे 15-20 वर्षे निवडून येणार नाही, त्यामुळे ती पूर्ण करण्याची वेळच येणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.
राम शिंदे यांच्या कामामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगतानाच त्यांच्या कामांचा विशेष उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला. कुकडीसारख्या प्रकल्पाला मान्यता मिळवून दिली. तुकाई चारी, शासकीय कृषी महाविद्यालय, होळकर विद्यापीठ, पाणी योजना अनेक कामे त्यांनी केली. त्यांच्या कामामुळे त्यांना जनतेचा आशीर्वाद मिळेल, यात शंका नाही, असे ते म्हणाले. लोकशाही धनदांडग्यांची नाही. पैशांच्या भरवशावर निवडणुका जिंकता येत नाही. तसे असते तर टाटा, बिर्ला अंबानी लोकसभेत दिसले असते. जो जनतेत असतो, त्यांच्याच मागे जनता असते, असे सांगत सामान्य माणसाने सामान्यांचा सेवक असलेल्या राम शिंदेना निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नागवडे, झावरेंचा भाजपात प्रवेश
यावेळी पालकमंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्याचे राजेंद्र नागवडे, पारनेर सुजित झावरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, मनसेचे तालुकाध्यक्ष राहुल निंबोरे, उपाध्यक्ष दत्ता शिपकुले, गणेश क्षीरसागर आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.
Post a Comment