शेती, पिण्याच्या पाण्याचे वाद कायम मिटणार : मुख्यमंत्री


एएमसी मिरर : वेब न्यूज
पाण्यावरुन कायम संघर्ष होतात. यासाठी गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यात येणार आहे. यासाठीचा सर्व आराखडा तयार आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे धरणातील शेती, पिण्याच्या पाण्याचे वाद कायम मिटणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कोपरगाव येथे जाहिर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे आदि उपस्थित होते.
दुष्काळ, पूर अवर्षणामुळे पिके जळतात. यातून शेतक-यांचे मोठे नुकसान होते. यासाठी शेतक-यांना शाश्वत सिंचन दिले. जलयुक्तशिवारमधून सिंचनाचे पाणी दिले. शेततळे, विहिरी दिल्या. निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी पैसा दिला आहे. या कामांसाठी मंत्री विखे यांनी पाठपुरावा केला. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविला. परंतु काहींनी शेतक-यांची दिशाभूल केली. राखीव पाण्यातून कोपरगावला पाणी दिले. शेतक-याच्या कोट्यातील पाणी दिले नाही. यासाठी आमदार कोल्हे यांनी मोठा पाठपुरावा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्टवादी काँग्रेस आघाडीच्या गेल्या 15 वर्षातील आणि भाजपच्या पाच वर्षाच्या काळातील कामांचा आलेख मांडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर तोफ डागली. शरद पवारांना प्रत्येक नागपूरकर गुंड वाटू लागला आहे. त्यांना जळी-स्थळी नागपूरचे गुंड दिसायला लागले आहेत. एका सामान्य नागपुरकरानं त्यांची ही अवस्था करून ठेवलीय, अशा शब्दांत त्यांनी पवारांवर टीका केली. यावेळी त्यांनी कलम 370 आणि पाकिस्तानचा मुद्द्यावर बोलणं टाळून गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. तसंच महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगावमधील बंडखोरीवर सूचक वक्तव्य केलं. आमदार स्नेहलता कोल्हे माझ्या भाची आहेत. त्यामुळे मामा म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहणे हे माझे कर्तव्यच आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post