मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले?


एएमसी मिरर : वेब न्यूज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बचावले आहेत. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. पेण या ठिकाणी प्रचारसभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण बोरगाव या ठिकाणी लँड झाले. त्याचवेळी हेलिकॉप्टरची चाकं चिखलात रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरचे नियंत्रण सुटले. मात्र पायलटने प्रसंगावधान दाखवत नियंत्रण पुन्हा मिळवले. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला, असे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे स्वीय सचिव, एक इंजिनिअर, एक पायलट आणि एक को पायलट असे पाचजण होते. हेलिगो प्रा. लि. चे हे हेलिकॉप्टर होते. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे. ४ वाजून २५ मिनिटे आणि ३० सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतली. त्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळवले. या सगळ्यानंतर सुखरुपपणे मुख्यमंत्री खाली उतरवण्यात आले. ज्यानंतर मुख्यमंत्री पेण येथील भाजपाचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले.

Post a Comment

Previous Post Next Post