मतदारांना वेळेत 'वोटर स्लीप'चे वाटप करा : राहुल द्विवेदी


एएमसी मिरर : नगर 
मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आता मतदान केंद्राचे नाव असणार्‍या वोटर स्लीप प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतील, यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.
निवडणूक आयोगाकडून मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार्‍या वोटर स्लीप प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकड़े पोहोच करण्यात आल्या आहेत. त्यांनी त्या तात्काळ मतदारांपर्यंत केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदान संकल्पपत्र, रांगोळी व निबंध स्पर्धा, प्रभात फेरी, वोट आर्मी, मतदारदूत, कॅम्पस ॲम्बॅसिडर अशा उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी त्यांना मतदान केंद्राचे नाव माहित व्हावे, यासाठी या वोटर स्लीप मतदारांना वाटप करण्यात येत आहेत. भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त या वोटर स्लीपमध्ये मतदारांचे छायाचित्र, नाव, पत्ता, लिंग, ओळखपत्र क्रमांक, यादी भाग क्रमांक, यादीतील अनुक्रमांक, मतदान दिनांक, मतदान केंद्राचे नाव आदींची माहिती असते. त्यामुळे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे आणि मतदानाचा हक्क बजावणे सुलभ होणार आहे.
सगळ्याच मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे वोटर स्लीप प्राप्त झाल्या आहेत. त्याचे वितरण तात्काळ सुरु करण्यात आले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्राप्त झालेल्या वोटर स्लीपपैकी ४५ हजारांहून अधिकचे वितरण करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे यांनी दिली. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील १ लाख २ हजार ३२१ वोटर स्लीप वितरित करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. कोपरगाव मतदारसंघात १ लाखाहून अधिक वोटर स्लीप वाटल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.
राहुरी, श्रीगोंदा, नेवासा, शेवगाव आणि अकोले येथील वोटर स्लीप आज प्राप्त होणार असून त्यानंतर त्याचे तात्काळ वितरण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली. श्रीरामपूर येथील वोटर स्लीप वितरित करण्यासाठी बीएलओ यांच्याकडे दिल्या असल्याचे निवड़णूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. कर्जत जामखेड येथील वोटर स्लीप प्राप्त झाल्या असून त्या वितरणासाठी बीएलओंकडे दिल्या जात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post