घडाळ्याचं बटन दाबलं तरीही मत कमळालाच?


एएमसी मिरर : वेब न्यूज

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान होत असताना साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडले. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे. याबाबत मतदारांच्या वारंवार तक्रारी आल्यानंतर संबंधीत मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरच घडाळ्याला मतदान करताना ते कमळाला जात असल्याचे त्यांनी मान्य केल्याचे वृत्त प्रमुख वाहिन्यांसह आघाडीच्या वृत्तपत्रांनी दिले आहे. 
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातल्या खटाव तालुक्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटन दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत दिल्याचे दिसत होते. ग्रामस्थांच्या हा प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.
ग्रामस्थांच्या या तक्रारींकडे सुरुवातीला मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर यामध्ये पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे नवले गावात काल मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण होते. दहा-बारा तक्रारी आल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इथले ईव्हीएम बदलण्यात आले. मात्र, तोवर सुमारे २९० मतदारांनी मतदान केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे नंतर वारंवार याबाबत मतदारांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधीत मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घडाळ्याला मतदान करताना ते कमळाला जात असल्याचं मान्य केलं. त्यानंतर हे ईव्हीएम बदलण्यात आलं आणि पुढील मतदान सुरळीत पार पडलं. मात्र, गंभीर घटनेबाबत आता पुढे निवडणूक आयोगाकडून काय कार्यवाही केली जाणार याबाबतच तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post