निवडणुकीला गालबोट; जामखेडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर चाकू हल्ला


एएमसी मिरर : नगर
जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात शाब्दिक होऊन झालेल्या राड्यात भाजपच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
दुपारी अडीचच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे (वय २८) व हर्षवर्धन शंकर फुंदे (वय २२) हे दोघे बांधखडक हे मतदान करण्यासाठी जात असताना शाब्दिक चकमक सुरू झाली. ते मोटारसायकलवर निघून जात आसताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भालेराव वनवे यांच्या नाकावर व हातावर चाकू हल्ला केला. तर हर्षवर्धन फुंदे याच्या हातावर चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघेही जखमी झाले. त्यांना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाल्यानंतर चिडलेल्या काही कार्यकर्त्यांनी तेथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या या वाहनावर दगडफेक केली. झटापटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांच्या हाताला मार लागला असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post