कर्जतमध्ये पैसे वाटण्याचा प्रयत्न; 'बारामती'करासह दोघांवर गुन्हा दाखल


एएमसी मिरर : नगर
येथील हायव्होलटेज लढत असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कोरेगाव येथे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (दि.२०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भरारी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी बारामती तालुक्यातील एकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आबासाहेब मधुकर सोनवळ (रा. टाकळी, ता. करमाळा) व किसन शिवाजी जाधव (रा. पारवडी, ता. बारामती) या दोघांना भरारी पथकाने पकडले आहे. या दोघांकडे २० हजार रुपयांची रोकड, मतदान प्रतिनिधी म्हणून प्राधिकृत पत्र व मतदार यादी सापडली आहे. मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व बाहेरील राजकीय व्यक्तींनी मतदारसंघात थांबू नये, या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर कलम 171 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बारामती व सोलापूर जिल्ह्यातून मतदारसंघात कार्यकर्ते आल्याने व पैसे वाटपाचे प्रयत्न उघडकीस आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांना पालकमंत्री राम शिंदे समर्थकांकडून टार्गेट करण्यात आले आहे. पैसे वाटण्याचा प्रयत्न करणारे दोघेही पवार यांचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post