जामखेड शहरातील मिलिंदनगर या ठिकाणी नगरसेवक गुलशन अंधारे व विद्या वाव्हळ यांनी पालकमंत्री राम शिंदे यांची घोड्यावर बसून प्रभागातून मिरवणूक काढली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व युवक सहभागी झाले होते. सभास्थानी नगरसेवक विद्या वाव्हळ, गुलशन अंधारे, राजेश वाव्हळ, विठ्ठल अण्णा राऊत, अमजद पठाण यांची भाषणे झाली.
राम शिंदे म्हणाले, तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम केले आहे. मंत्रीपदाचा उपयोग त्यासाठी केला आहे. आगामी काळात जामखेड शहर व तालुक्याला पाहण्यासाठी परराज्यातून लोक येतील असा मतदारसंघ मी बनवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मला मंत्रीपद जाहीर केले आहे. आता तुम्ही मतदारांनी मला साथ द्यावी, तालुक्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, एमआयडीसी तसेच महिलांना बचत गटामार्फत उद्योगधंदे, व्यवसाय उभारण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. आता बाहेरून आलेली धनशक्ती दीपावलीच्या सणानिमित्त तुम्हाला किराणा भरून देईल, तो तुम्ही अवश्य घ्यावा. अनेक जणांचे बँक अकाउंट, आधार कार्ड त्यांच्या घेऊन गेले आहेत. त्यामुळे जनतेने त्यांचा पैसा घ्यावा, तुम्ही स्वाभिमान म्हणून मला मतरूपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष निखिल घायतडक पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, महेश निमोणकर, पोपट राळेभात, प्रवीण चोरडिया, अनिल पवार व जामखेड नगर परिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.