सर्वसामान्यांची ताकद दाखवून देण्याची वेळ आलीय : खा.सुजय विखे


एएमसी मिरर : नगर
पालकमंत्री राम शिंदे यांनी अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेत. विकास दिसायला वेळ लागतो. हा काही चमत्कार नसतो. जी कामं त्यांनी मंजूर केली आहेत, ती पुढील काळात प्रत्यक्षात येणारच आहेत. कर्मचारी, कारखाने, संस्था त्यांच्याकडे नाहीत. सर्वसामान्य जनता हाच राम शिंदेंचा आधार आहे. सर्वसामान्यांचा आशीर्वाद त्यांच्याकडे आहे. आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठिशी आहोत, तुम्हीही त्यांच्या पाठिशी उभे रहावे. गोरगरीब विरुध्द साखर सम्राट अशी ही निवडणूक असून सर्वसामान्यांची ताकद दाखवून देण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले.
कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री शिंदे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. खासदार विखे यांनी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, मागील 15 दिवसांत कर्जत-जामखेडच्या राजकारणाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न झाला. अनेक आमिषे दाखविली गेली. प्रलोभने दिली गेली. मागील 30-40 वर्षांत जिल्ह्यात असे राजकारण कधी पाहायला मिळाले नाही. कुठल्याची प्रश्नाला नैतिकता राहिली नाही. आर्थिक बाबींचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. कार्यकर्ते फोडले गेले. आजपर्यंत जे टँकर सुरू होते, ते कायम राहणार आहेत का? शाळांमध्ये जे पॅड वाटले गेले, कॉम्प्युटर वाटले गेले, ते कायम वाटले जाणार आहेत का? शिवसेना-भाजपच्या ज्यांना आर्थिक प्रलोभने दाखवून स्वतःच्या व्यासपिठावर घेतले, ते यापुढे कायम दिसणार आहेत का? याचा विचार येथील जनतेने करायला हवा. पुढच्या पिढीला अंधारात ढकलण्याचे पाप यांच्याकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
पवार कुटुंबियातील प्रत्येक जण येथे येऊन कर्जत-जामखेडची बारामती करणार असे म्हणतात. तुम्ही जर खरच बारामतीचा विकास केला होता, तर लोकसभेत तुम्हाला 50 सभा का घ्याव्या लागल्या? गल्ली, बोळात सभा का घ्याव्या लागल्या? साडेतीन लाखांचे मताधिक्क्य एक लाखाच्या आत कसे आले? असे सवाल करत विखे यांनी पवार कुटुंबियांवर निषाणा साधला. कर्जत-जामखेडला पाणी देणार असे आता सांगत आहेत. मात्र, कुकडीचे पाणी आलेले नसतांनाही  अंबालिकाच्या बंधार्‍याला सातत्याने पाणी कसे मिळाले? शेतकर्‍यांचे सिंचन नाही झाले. त्यांना पाणी मिळाले नाही. मात्र, यांच्या कारखान्यासाठी पाणी कसे मिळाले? बंधारे तुडूंब कसे होते? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. क्षणिक सुखासाठी युवकांना भरकटवले जात असल्याचे सांगत जनतेने प्रामाणिकपणे काम करणार्‍या राम शिंदे यांच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post