नगर : नागरिकांनी लिहिले लोकशाहीला पत्र


एएमसी मिरर : नगर 
आपल्या भारतीय लोकशाहीची गणना जगातील सर्वोत्तम शासन पद्धतीमध्ये होते. आपण भारताचे नागरिक आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, म्हणून प्रत्येक भारतीयाने देशात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नि:संकोचपणे मतदान करावे. निवडणूक व मतदान ही लोकशाहीची महत्त्वाची साधनं आहेत. या साधनाचा उपयोग देशाला पुढे नेण्यासाठी करूया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.


विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून शहरातील माळीवाडा येथील मुख्य बसस्थानकावर "एक पत्र लोकशाहीला" हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन या उपक्रमात लोकशाहीला पत्र लिहिले. कुणी मतदान करण्याचा संकल्प लिहीला, तर कुणी निर्भयपणे मतदान करण्याची शपथ लिहिली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी अभिनव खरे, स्विप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, स्वीप समिती सदस्य तथा शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, वोट आर्मीचे कॅम्पस अँम्बेसिडर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांनी मतदानाची शपथ दिली. कार्यक्रमस्थळी पोस्ट कार्डाचा मोठा नमुना तयार करण्यात आला होता व त्यावर मतदानाची शपथ लिहिण्यात आली होती.


प्रति, भारताची लोकशाही, द्वारा: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, स्वीप समिती, अहमदनगर ४१४००१ या पत्त्यावर ही सर्व लोकशाहीला लिहिलेली पत्रे पोस्टमन पोहोच करणार आहे. पत्राची लाल पेटी देखील आयोजकांच्या वतीने याठिकाणी पत्र टाकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मुख्य बस स्थानकावरील सुमारे सहा हजारापेक्षा जास्त प्रवाशांनी दिवसभरामध्ये ही पत्रे लिहिली. पत्र लिहिण्याबरोबरच नागरिकांनी मतदार स्वाक्षरी अभियानात देखील सहभाग घेतला व मतदान करण्याची संकल्प स्वाक्षरी देखील नोंदवली. आकर्षक वोट सेल्फी पॉइंट कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. मेरे देश की सेल्फी वोट स सेल्फी स्पर्धेमुळे अनेकांचे मोबाईल सेल्फी काढण्यासाठी सरसावले. कॅम्पस अँम्बेसिडर संतोष कानडे, स्वाती अहिरे, किशोर अहिरे, नाना डोंगरे, गणेश ढोले, प्रा. सतीश शिर्के, आकांक्षा ढोरजकर, सुजाता नेलवाल, प्रा. राहुल पाटोळे आदींनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post