भाजपने आमच्या पक्षाला धोका दिला : महादेव जानकर


एएमसी मिरर : वेब न्यूज 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपा-शिवसेनेने झोकून दिले असतानाच महायुतीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षावर अन्याय झाला असून भाजपने आमच्या पक्षाला धोका दिला असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. दौंडचे उमेदवार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर त्यांनी अर्ज भरले. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असेही जानकर यांनी सांगितले.
जागावाटपाचं बोलणं झालं होतं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. पण, सरळसरळ फसवलं आहे. भाजपाने मला फसवलं. माझ्या पक्षाला धोका दिला. दौंड, जिंतूर विधानसभा मतदारसंघाबाबत पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील. सध्या गंगाखेड हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून, त्या ठिकाणी रत्नाकर गुट्टे हे रासपचे उमेदवार असतील, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
आज आम्ही महायुतीतून बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही. आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच लढणार आहोत. 288 जागांवर मी महायुतीला मदत करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली.  हे बरोबर आहे, मात्र आज शिवसेना जात्यात आहे आणि मी पण भरडलो गेलो आहे, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post