मोठ्या लढतींच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. राज्यात एकूण 288 मतदारसंघाचे चित्र उद्या स्पष्ट होणार असून मोठ्या लढतींच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.


परळी :
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विरुद्ध महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यात लढत होत आहे. मतदानाच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ, भाषणानंतर कोसळलेल्या पंकजा मुंडे, त्यानंतर दोघांचीही भावूक साद घालणारी पत्रकार परिषद यामुळे मतदारसंघातील चूरस वाढली आहे.

कर्जत-जामखेड :
नगर जिल्ह्यातील सर्वात हायव्होल्टेज लढत कर्जत-जामखेड मतदारसंघात होत आहे. पालकमंत्री राम शिंदे हे विद्यमान आमदार आहे. यंदा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राम शिंदेंपुढे आव्हान उभे केले आहे. निकालापूर्वीच पवार यांच्या विजयाचे फलक मतदारसंघात झळकले आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांची नजर असणार आहे.

कोथरूड :
पुण्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे मोठा गदारोळ झाला होता. चंद्रकात पाटील यांना ब्राह्मण महासंघाने विरोध केला, परंतु शेवटच्या टप्प्यात हा विरोध मावळला. या मतदारसंघात पाटील यांच्यासमोर मनसेचे किशोर शिंदे यांचे आव्हान आहे. शिंदे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने हा मतदारसंघ आणखी रंगात आला.

कणकवली :
रत्नागिरी जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे सतिश सावंत अशी थेट लढत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार दिल्याने चूरस वाढली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे झंझावाती सभा घेत ‘असा शत्रू मित्रपक्षातही नको’ अशी भूमिका घेत इशारा दिला होता. तसेच मतदानापूर्वी भाजपचा पारंपारिक मतदार ब्राह्मण समाजाने नितेश राणे यांनी मराठा-ब्राह्मण यांच्या द्वेष वाढवल्याचे म्हणत त्यांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

सातारा :
विधानसभा निवडणुकीसह साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडले. साताऱ्यात छत्रपती उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या तिकीटावर ते रिंगणात उतरले. उदयनराजे यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचे आव्हान आहे. त्यांच्यासाठी खास शरद पवार यांनी पावसात सभा घेत लोकांची मनं जिंकली होती.

Post a Comment

Previous Post Next Post