सर्वच सत्ताधार्‍यांनी मुस्लिम मतांचा वापर करुन घेतला : इम्तियाज जलील


एएमसी मिरर : नगर
आजपर्यंत सर्व सत्ताधार्‍यांनी मुस्लिम मतांचा फक्त निवडणुकीपुरता वापर करुन घेतला. आता बदल घडविण्यासाठी स्वत:चा हक्क मागण्याची वेळ आली आहे. आम्ही सरळ आहोत. तुम्हीही सरळ वागा. धमकावण्याची भाषा करणार्‍यांना आम्हीही धडा शिकवू, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. स्वत:च्या अस्तित्वासाठी व विकासासाठी ‘एमआयएम’च्या उमेदवाराच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
नगर शहर विधानसभा मतदारसंघातील एमआयएमने मनपाचे नगरसेवक आसिफ सुलतान यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर आयोजित सभेत बोलतांना खासदार जलील यांनी आघाडी, युतीला टार्गेट केले. यावेळी एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिल मुजावर, प्रवक्ते धम्मराज साळवे, महासचिव शफीउल्ला काझी, मौलाना महेफुजूल रहेमान, मुक्ती अल्ताफ, जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी, जावेद शेख, इमरान सय्यद, वसिम खान, समीउल्ला खान, वाजिद सय्यद आदींसह एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार जलील म्हणाले की, सर्व धर्मांना बरोबर घेऊन एमआयएम वाटचाल करीत आहे. पक्षाने सर्वच धर्मातील उमेदवारांना निवडणुकीत संधी दिली आहे. नगर शहर ऐतिहासिक असून, त्याला सुलतानांचा वारसा आहे. या एमआयएमच्या सुलतानला निवडून दिल्यास शहराला गतवैभव प्राप्त होऊन शहराचा विकास होईल, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post