कुकडीच्या पाणीप्रश्नावरुन राम शिंदेंचा पवारांवर हल्लाबोल


एएमसी मिरर : नगर
गेली अनेक वर्षे पवार घराण्याने सत्ता उपभोगली. त्यावेळी त्यांना कर्जत-जामखेडची आठवण झाली नाही. सत्तेच्या हव्यासापोटी आता शेतकर्‍यांच्या  भावनांशी ते खेळत आहेत. तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी कुकडीचे पाणी देता येणार नाही, असे पत्र दिले होते. मग आजच कुकडीच्या पाण्यावरुन पवारांना साक्षात्कार कसा झाला? असा सवाल करत शेतकर्‍यांबबात व मतदारसंघाबाबत त्यांची प्रेम बेगडी असल्याच्या शब्दांत पालकमंत्री राम शिंदे यांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.
जामखेड येथे बाजारतळावर झालेल्या सभेत त्यांनी पवार कुटुंबियांसह रोहित पवारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, त्यांचा बदला घ्यायचा आहे. पंकजा मुंडे यांचा भाऊ या नात्याने ही जबाबदारी आता माझ्याकडे आहे. पन्नास वर्षांत तुम्ही कर्जत-जामखेडला काही दिले नाही. कुकडीचे पाणी मिळू दिले नाही. आता चॉकलेट, बिस्कीट वाटत फिरत आहेत. येथील जनता दुधखुळी नाही. या मतदारसंघात ‘मावळ पार्ट 2’ होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.
 कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांची कुकडीच्या पाण्यावरुन दिशाभूल केली जात आहे. परंतु ही जनता गरीब असली असती तरी स्वाभिमानी आहे. येत्या 21 तारखेला आपला स्वाभिमान दाखवून बारामतीचे पार्सल ते परत पाठवतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जामखेड शहरामध्ये राम शिंदे यांच्या प्रचारार्थ खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शिवसेनेचे उपनेते रमेश खाडे यांनी प्रचार फेरी काढून जनतेशी व व्यापार्‍यांशी संवाद साधला.

Post a Comment

Previous Post Next Post