50 वर्षांत पवारांना 'कर्जत-जामखेड' दिसला नाही का? राम शिंदेंचा सवाल


एएमसी मिरर : नगर
जे जन्मतःच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत, त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न काय समजणार? राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे 50 वर्षे सत्तेत होते. तेव्हा त्यांना कर्जत-जामखेड मतदारसंघ दिसला नाही का? असा सवाल पालकमंत्री राम शिंदे यांनी केला आहे.
जामखेड तालुक्यातील हापाटेवाडी येथे नागरिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जामखेड तालुका अध्यक्ष रवी सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरूमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पचारणे, शिवसेना तालुका अध्यक्ष काका काशीद, मोहा गावचे सरपंच शिवाजी डोंगरे, शरद कार्ले, आप्पासाहेब ढवळे, करण ढवळे, सुभाष जायभाय, मकरंद काझी आदी उपस्थित होते.


राम शिंदे म्हणाले की, हापटेवाडी गावात व कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील पाच, दहा वर्षात जी कामे झाली, यापूर्वीच्या 50 वर्षांत झालेली नाहीत. 50 वर्षे पवार कुटुंबियांच्या घरात सत्ता होती. तेव्हा त्यांना हा मतदारसंघ दिसला नाही का? 50 वर्षांत त्यांनी या मतदारसंघात कामे का नाही केली? असा सवाल त्यांनी केला आहे. मी केलेली कामे जनतेच्या समोर आहेत. विकासकामांच्या जोरावर व नागरिकांच्या पाठबळावर माझा विजय निश्चित आहे. त्यामुळे 24 तारखेनंतर ते या मतदारसंघात दिसणार नाहीत, असा टोलाही राम शिंदे यांनी रोहीत पवार यांना लगावला. माझ्या विरोधात प्रचारासाठी त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही. त्यांनी स्वतःही काहीच कामे केलेली नसल्याने त्यांच्याकडे सांगायलाही काही नाही. त्यामुळे कर्जत-जामखेडची जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असेही ते म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post