तुरुंगात असलेले रमेश कदम सापडले ठाण्यातील घरात, 53 लाखांची रोकड हस्तगत


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारवाई करताना पोलिसांना घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले रमेश कदम हे देखील सापडले. ठाणे गुन्हे शाखा युनिट एक आणि निवडणूक विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
कारवाईच्या प्राथमिक चौकाशीत, रमेश कदम यांना जेजे रुग्णालयात तपासणीसाठी ठाणे कारागृहातून नेण्यात आले असल्याचे समजले. मात्र, तपासणी झाल्यावर पुन्हा तुरुंगात नेण्याऐवजी पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याला ओळखीच्या एका माणसाच्या घरी नेले. त्याच वेळी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तिकडे धाड टाकली. त्यामुळे रोख रक्कमेसह रमेश कदम आणि एक व्यक्ती पोलिसांना सापडले.
रमेश कदम सध्या मोहोळ इथून अपक्ष निवडणूक देखील लढवत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही रक्कम जप्त करुन आयकर विभागाकडे सोपवली आहे. तर रमेश कदम यांना नियमाबाहेर जाऊन खासगी ठिकाणी नेल्याप्रकरणी पोलीस इस्कॉर्ट पार्टी मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post