प्रथमच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक; संग्राम जगताप यांचा विजयाचा दावा


एएमसी मिरर : नगर
शहरात मागील काळात केवळ भावनेच्या आधारावर निवडणुका केल्या गेल्या. मात्र, मी मागील पाच वर्षात केलेल्या कामांमुळे या निवडणुकीतही विकासाचे व्हिजन नागरिकांसमोर मांडले. त्यामुळे प्रथमच शहराची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आली. नागरिकही विकासाचा विचार करत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.
शनिवारी (दि.19) सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होत असताना आ.जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. जगताप म्हणाले की, मागील 25 वर्षे विकासाबाबत कुठलेही काम झाले नाही. त्यामुळे संपूर्ण एक पिढी विकासापासून वंचित राहिली. या निवडणुकीत आम्ही विकासाचे व्हिजन मांडले. मागील पाच वर्षे जे काही काम करु शकलो, त्यातून नागरिकांच्याही विकासाबाबत अपेक्षा उंचावला. विरोधकांवर फारशी टीका-टिपण्णी न करता विकास हाच अजेंडा समोर ठेवून ‘व्हिजन 2024’ जनतेसमोर मांडले. उद्याच्या काळात येणार्‍या पिढीला शहरातच सर्व सुविधा व संधी मिळाली पाहिजे, हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.


मागील काळात शहरासह उपनगर परिसरातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. तपोवन रस्ता, बोल्हेगाव रस्ता, निंबळक रस्ता, बुरुडगाव रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. काही कामे प्रगतीपथावर आहेत. सावेडी उपनगर परिसरातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत. उद्यान निर्मितीसह इतर सुविधाही उपलब्ध करुन देण्यासाठी कायम प्रयत्न केले आहेत. येत्या काळात तरुण वर्ग, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्याबाबत सर्व क्षेत्रांशी निगडीतस उपाययोजना व विकासाच्या कामांबाबत भूमिका मांडून आम्ही पुढे जात आहोत. शहरातील डीपी रस्ते, महिलांसाठी गृहउद्योग, भिंगार येथे क्रीडासंकुल, रोजगार, मूलभूत सुविधा आदींवर आम्ही लक्ष केंद्रीत करुन शहराच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आ.जगताप यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post