'राज्यात सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा आमच्या हाती द्या'


एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्राला प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष तुमच्या मनातली खदखद व्यक्त करु शकतो. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकतो. आज मी तुमच्याकडे प्रबळ विरोधी पक्षाची मागणी मागत आहे. मला माझ्या पक्षाचा आवाका माहित आहे. मला राज्यात सत्ता नको तर विरोधी पक्षाची धुरा आमच्या हाती द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी केले आहे.
मुंबईतील वांद्रे येथे राज ठाकरेंची पहिली प्रचार सभा पार पडली. यामध्ये त्यांनी अनेक विषयांना हात घातला. शहरांची बकाल अवस्था आणि रस्त्यावरील खड्डे यावरुनही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शहरांच्या नियोजनात अभाव आहे. निवडणुका आल्या की राजकीय पक्षांचे जाहीरनामे बाहेर येतात. मनात येईल ती आश्वासने दिली जातात. मात्र परिस्थिती 'जैसे थे ' अशीच असते. विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात. मग तुमचे प्रश्न मांडणार कोण? बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. अशी परिस्थितीत आपण सत्ताधाऱ्यांना कधी प्रश्न विचारणार आहोत? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

Post a Comment

Previous Post Next Post