बाळासाहेबांना अटक राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी चूक : अजित पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती, अशी कबुली राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या तोंडी परीकक्षा कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.
शरद पवारांची ईडी चौकशी राजकीय सूडाच्या भावनेपोटी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना झालेल्या अटकेची आठवण करुन दिली होती. यासंदर्भात अजित पवारांना या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात त्यांनी बाळासाहेबांची अटक ही चूक असल्याचे म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, त्या काळात माझं मत होतं की इतक्या टोकाचं राजकारण करू नये. मात्र त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी त्यांना अटक करण्यात आली. वास्तविक कुणाच्याही बाबतीत असं करू नये, असे अजित पवार म्हणाले. आम्ही यावर आक्षेप घेतला असता 'आम्ही त्या विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करणार आहोत', असं म्हटलं गेलं, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post