एखाद्या घटनेचे भांडवल करण्यात ‘ते’ पटाईत : माणिकराव विधाते


एएमसी मिरर : नगर
शहरात निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. जाणीवपूर्वक एखादी घटना घडवून त्याचे राजकीय भांडवल केले जाऊ शकते. हे लोक एखाद्या घटनेचे भांडवल करण्यास कसे पटाईत आहे, हे विविध घटनेतून सिध्द झालेले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी शिवसेनेवर केला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले आहे. यावेळी प्रा.विधाते, बाबासाहेब गाडळकर, अरविंद शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरात कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, पोलिस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी सारसनगर भागात रात्रीच्या वेळी रिक्षा जाळून त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला होता. आताही एखादी घटना घडवून त्याचे राजकीय भांडवल केले जाऊ शकते. एखाद्या घटनेचे राजकीय भांडवल करण्यात ते पटाईत आहेत. पोलिसांनी याची दक्षता घेऊन कार्यवाही करावी, असे विधाते यांनी निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post