व्यापार, उद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण केले : आ. संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर  
शहरात या पूर्वी नेतृत्व करणाऱ्यांनी कधीही बाजारपेठेसाठी पोषक वातावरण निर्माण केले नाही. अनुचित प्रकार घडवायचा व नंतर बाजारपेठ बंद करायच्या, अशा प्रकारामुळे येथील बाजारपेठा उद्ध्वस्त झाल्या. व्यापाराचे नुकसान करण्याचे काम त्यांनी केले. मी फक्त विकासाचे राजकारण करून पोषक वातावरणात निर्माण करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राजेंद्र चोपडा, विशाल शेटीया, डॉ.सचिन भंडारी, कमलेश भंडारी, भूषण भंडारी, नितिन शिंगवी, राजेश भंडारी, मुकुंद धूत, विनोद मालपाणी, भरत जाकोटिया, दिपक बोयटा, अनिल लुंकड, ईश्वर बोरा, सुनिल भंडारी, धनेश कोठारी, राहुल भंडारी, अमित मुथा, प्रशांत मुथा, अविनाश घुले, प्रविण कोठारी, अभय गुजराथी, भाऊसाहेब पांडुळे, सचिन डुंगरवाल, सुरेश धामत आदी उपस्थित होते.
आ.जगताप म्हणाले की, येत्या काळात शहराला महानगराची ओळख आपल्याला निर्माण करुन द्यायची आहे. त्यासाठी मी विकास हाच मुद्दा समोर ठेवून काम करत आहे. पक्षीय राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मी गेल्या पाच वर्षापासून सर्वांना बरोबर घेत विकासासाठी प्रयत्न केले. बंद पडलेल्या आयटीपार्कमध्ये कंपन्या सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ज्यांनी २५ वर्ष व्यापार, उद्योग बुडविले, ते आता निवडणुकीच्या निमित्ताने पोकळ गप्पा मारत आहेत, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.
राजेंद्र चोपडा म्हणाले की, आ.अरुण जगताप यांच्यामुळेच आनंदऋषी महाराजांच्या नावाने हॉस्पिटल उभे राहिले. आनंदऋषी महाराजांच्या समाधीस्थळ परिसराचा विकासही आ.जगताप यांनीच केला. व्यापार्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. सर्व व्यापारी वर्गाने आ. जगताप यांच्या पाठिशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post