‘शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्याचा अधिकार शिवसेनेने गमावलाय’


एएमसी मिरर : नगर
छत्रपती शिवरायांचे गड किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय सत्ताधार्‍यांनी घेतला. मंत्रिमंडळात हा निर्णय होत असतांना सत्तेत असूनही शिवसेनेचे मंत्री मूग गिळून बसले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्याचा अधिकारच शिवसेनेच्या उमेदवाराने गमावला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. नगरच्या उमेदवारांनी पंचवीस वर्षात कधीही विकासाच्या मुद्यावर मत मागितले नाही. आमदार संग्राम जगताप यांनी मागील पाच वर्षात नगर शहराला विकास कसा असतो, हे दाखवून दिले आहे. शहराच्या विकासाला त्यांनी दिशा दिली, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ माळीवाडा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण जगताप, आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आदींसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
खा.कोल्हे म्हणाले की, राज्यात कोणत्याही पक्षाची कोणतीही लाट नाही. वातावरण बदलते आहे. सत्ताधारी भाजप-सेनेच्या अजगराने चौकशी, सीबीआयची कारवाई, ईडीची भीती दाखवत काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांना गिळंकृत केले आहे. या अजगाराने शरद पवारांवर यांच्यावरही अ‍ॅटॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरद पवारांनी या अजगराची हवाच काढून घेतली, असा टोला त्यांनी लगावला. आमदार जगताप अठरापगड जातीच्या, बारा बलुतेदारांच्या भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरात विकास कामे करत आहेत, असेही ते म्हणाले.
संग्राम जगताप म्हणाले की, आजची निवडणूक राजकारणाची नसून शहराला दिशा देणारी व युवकांच्या भविष्याचा विचार करणारी निवडणूक आहे. विरोधकांनी शहरात एकाही विकास कामाचा साधा प्रस्तावही कधी शासन दरबारी मांडला नाही. विकासकामांचे कोणतेही व्हिजन त्यांच्याकडे नाही. आम्ही काही महिन्यात नियोजन करत शहरात आयटी पार्क सुरू करून चारशे-पाचशे युवकांना नोकर्‍या देऊ शकतो, हे दाखवून दिले. त्यांनी 25 वर्षात 25 युवकांना रोजगार दिल्याचे दाखवावे. यासाठी जाहीरपणे चर्चा करण्यासाठी समोर येण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे. ब्राह्मण समाजाने निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा देण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी ब्राह्मण समाजाचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post