नगरमध्ये कंपन्या सुरु करण्यासाठी मोठ्या उद्योजकांकडे आग्रह धरणार : आ. संग्राम जगताप


एएमसी मिरर : नगर
उद्योग वाढवण्यासाठी पोषक वातावरणाची गरज असते. यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. नगर एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग येण्यासाठी मोठ्या उद्योजकांशी चर्चा करून त्यांना नगरमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी आग्रह धरणार आहे. उद्योगावर व व्यवसायावर आपल्या शहराचे अर्थकारण अवलंबून असते. उद्योग व्यापार वाढल्यास रोजगार निर्मिती होते व शहरामध्ये प्रत्येकाजवळ भांडवलाची देवाण-घेवाण होते. आपल्या शहरामध्ये विकासाचा प्रश्न येतो, तेव्हा ते हाणून पाडण्याचे काम केले जाते. तर इतर शहरामध्ये सर्व पक्ष एकत्र येवून विकासाचा प्रश्न मार्गी लावतात. नगर शहर समृद्ध करण्यासाठी सर्वांनी अशाच प्रकारे एकत्र यावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडी येथे आमी या उद्योजकांच्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत आ. संग्राम जगताप बोलत होते. यावेळी अध्यक्ष राजेंद्र कटारिया, संस्थापक अशोक सोनवणे, मिलींद कुलकर्णी, आटो क्लस्टरचे अध्यक्ष भिंगारे, सुनील मुनोत, सुमित लोढा, संजय चव्हाण, रविंद्र बक्षी, जनक आहुजा, प्रफुल्ल पारख, नरेंद्र बाफना, गौरव नय्यर, अशोक कर्नावट आदी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, क्रॉंम्प्टन कंपनीवर एमआयडीसीतील 100 ते 125 उद्योग अवलंबून आहेत. या सर्वांच्या अडचणी व प्रश्न मी मार्गी लावणार आहे. चांगल्या कामासाठी कोणाच्या पाया पडण्याची वेळ आली तरी चालेल. या कामासाठी मी कंपनी व्यवस्थापकाशी चर्चा करणार आहे. एमआयडीसीतील उद्योजकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला पाठींबा दिला याबद्दल मी सर्वांना आभारी आहे.
अशोक सोनवणे म्हणाले, औद्योगिक वसाहतीमध्ये प्रोब्लेम आला की लगेच आ. संग्राम जगताप आमचा प्रश्न मार्गी लावतात. त्यांनी क्रॉंम्प्टन कंपनीचा प्रश्न मार्गी लावावा. अनेक छोटे उद्योजक व कामगार अवलंबून आहेत. राजकीय नेतृत्व चांगले असेल तर उद्योगाचा विकास होतो. उद्योग व्यवसायासाठी राजाश्रय असेल तर विकास होतो. आ. संग्राम जगताप यांना कमी वेळात प्रश्न सोडविण्याची कला अवगत झाली आहे. ज्येष्ठ माणसाला लाजवेल असे काम आ. जगताप करतात.
राजेंद्र कटारिया म्हणाले, आ. संग्राम जगताप यांच्याकडे पाहून आम्ही सर्व उद्योजक मतदान करणार आहे. आमचा कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे फोनद्वारे सांगितला की, तो प्रश्न दोन दिवसात मार्गी लागतो. त्यांनी कमी वयात आयटी पार्कचा प्रश्न मार्गी लावला. धुळखात पडलेल्या इमारतीचे रूप पालटले. आम्ही आता कुठल्याही पक्षाचा विचार न करता आ. संग्राम जगताप यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post