नगर : भाजपमध्ये गेले अन् ४० वर्षांची सत्ता गमावली


एएमसी मिरर : नगर 
अकोले विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित पिचड पिता-पुत्रांना जनतेने जोरदार झटका दिला आहे. राष्ट्रवादीतून भाजपात केलेल्या पक्षांतराला अकोलेकरांनी नाकारल्यामुळे पिचडांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी पिचडांना धडा शिकविला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांनाही या पक्षांतरामुळे मोठा धक्का बसला होता. तालुक्याच्या विकासासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचे पिचड यांनी म्हटले होते. शरद पवार यांनी याच मुद्द्यावर पिचड यांच्यावर तोफ डागली होती. मागील अनेक वर्षे सत्तेत असताना, मंत्री असताना काय करत होते? असा सवाल त्यांनी केला होता. जनतेनेही असाच काहीसा विचार करत गेली ४० वर्षे मतदारसंघातून नेतृत्व करणाऱ्या पिचडांना घरचा रस्ता दाखवला. डॉ. किरण लहामटे यांनी मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव केला.
दरम्यान, लोकांनी दिलेला कौल मान्य करतांनाच पक्षांतराचा फटका बसल्याची शक्यता पिचड यांनी फेटाळली. आमचे जुने चिन्ह आमच्या नावावर खपवले का? हे तपासावं लागेल, असेही ते म्हणालेत. मतदारसंघातील लोकांच्या भावनेचा आदर करत पुढील काळात पराभवाची कारणे शोधणार आहे. नवीन आमदारांच्या हातून चांगली कामे झाली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करत वैभव पिचड यांनी किरण लहामटे यांचे अभिनंदनही केले आहे.
अकोले मतदारसंघातील लोकांमुळे हा विजय पाहता आला. हा विजय रखडलेल्या विकासाचा, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याचं दिसून येत आहे. विजयाची पूर्ण खात्री होती पण एवढं मताधिक्य मिळेल यांचा अंदाज नव्हता. पुढील पाच वर्षात आदर्श तालुका करण्याचा आपला मानस असेल. शाळा,आरोग्य, पर्यटन, रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे नवनिर्वाचित आमदार किरण लहामटे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post