नगर : शिवसेनेविरोधात 'आरपीआय'चे बंड


एएमसी मिरर : नगर
शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात आरपीआयने बंडाचे निशाण फडकावले आहे. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्ष नगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांचे काम करणार नसल्याचे आरपीआयचे सचिव अजय साळवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. महायुतीतील शिवसेना पक्षाने आरपीआयच्या उमेदवारांना जागा न सोडल्याने व आरपीआयच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महायुती रिपब्लिकन मतांचा फायदा घेत राज्यात सत्तेवर आली. रिपाईसही केलेल्या युतीमुळे शिवसेना आणि भाजपला मागील निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत रिपाईला सत्तेत वाटा देताना शिवसेनेने रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागेवर उमेदवारांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आरपीआय कार्यकर्ते नाराज आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकजुटीचे स्वप्न पूर्ण केले. परंतु सध्याच्या शिवसेना नेतृत्वाने त्या स्वप्नांना काळिमा फासण्याचे काम केले असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.
रिपाइंची युती भाजपासोबत असली तरी महायुतीतील घटक पक्ष शिवसेना रिपाई मताचा वापर निवडणुकीत करून घेत आहे. परंतु रिपाईला जागा देण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यांच्याकडून भाजपाकडे बोट दाखवण्यात येते. त्याचा निषेध म्हणून नगर जिल्ह्यातील आरपीआयचे कार्यकर्ते शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणार असून, जिल्ह्यातील नगर शहर, पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर येथील शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आरपीआय विधानसभेची आपली भुमिका स्पष्ट करणार आहे, असेही सालवे यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष किरण दाभाडे, विजय चाबुकस्वार, अशोक केदारे, रमेश भिंगारदिवे, अविनाश भोसले, संजय कांबळे, सदाभाऊ भिंगारदिवे आदींसह आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post