ते थोरात असतील, तर आम्ही जोरात आहोत : उद्धव ठाकरे


एएमसी मिरर : वेब न्यूज
थोरातांचे नेते बँकॉकला गेले आहेत, त्यामुळे त्यांनी आता घरी जायला हरकत नाही. ते थोरात असतील तर आम्ही जोरात आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान दिले आहे. सुशीलकुमार शिंदेंनी देखील आता आम्ही थकलो आहोत, अशी कबुली दिली असल्याचे सांगत त्यांनी निशाना साधला.
संगमनेरमध्ये साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. सर्व चांगले लोक आमच्याकडे आलेत. धगधगते निखारे आज आमच्यासोबत आले आहेत त्यामुळे तुमचा विस्तवं पेटतोय का ते बघा. जे काही तुमचे पाच दहा निवडून येतील ते तरी आमचं सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का? याचा विचार करा, असं होणार असेल तर मग कशाला त्यांना मतं द्यायची. ही तुमच्या भविष्याची निवडणूक आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी संगमनेरच्या जनतेला केले. विरोधीपक्ष नेते असतानाही सरकारच्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही युतीच्या परिवारात आलात याला धाडस लागतं, यासाठी राधाकृष्ण विखे-पाटलांना मी धन्यवाद देतो, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच सुजय विखेंच्या विधानाचा हवाला देताना उद्धव ठाकरे म्हणाले, सुजयने नगरमध्ये १२-० असा निकाल सांगूनच टाकला आहे. त्यामुळे विरोधकांचे आता बारा वाजवायचे आहेत.
जिल्ह्याच्या विकासकामांबरोबर शेतकऱ्यांसाठी आपण योजना करणार आहोत. नगरमध्ये आता आम्ही पाणी आणणार आहोत. या पाण्यामध्ये विकासाचं प्रतिबिंब दिसेल. निळवंडे धरण आणि पश्चिमेकडे जाणाऱ्याचा पाण्याचा समावेश आहे. त्याचबरोबर नगर जिल्ह्यासाठी नवीन विकासाची कामे आम्ही हाती घेत आहोत. यामध्ये एमआयडीसी, पाण्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये कसे मिळणार याची योजना मी करुन ठेवलीय. येत्या पाच वर्षात मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन दाखवणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही केवळ कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करणार आहोत, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.Post a Comment

Previous Post Next Post