शरद पवार भिजले, उदयनराजे हरले!एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराचा फटका उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात बसला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. श्रीनिवास पाटलांनी त्यांना पराभूत केलं असलं तरी या विजयाचे खरे शिल्पकार शरद पवारच आहेत.
शरद पवारांची पावसात सभा
पायाला होणाऱ्या असह्य वेदना आणि अशा अवस्थेत 79 वर्षांच्या शरद पवारांनी 18 ऑक्टोबर साताऱ्यात भरपावसात सभा घेतली. ही सभा साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरली. भर पावसात भाषण करणाऱ्या शरद पवारांची दृश्ये प्रेरणादायी ठरली. व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुकवर केवळ पवारांच्या भर पावसातील भाषणाची चर्चा होती. या सभेत राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंवर त्यांनी निशाणा साधला. लोकसभेत उदयनराजेंना उमेदवारी देऊन चूक केली, अशी कबुली शरद पवारांनी दिली.
साताऱ्यात कॉलरचा नाही तर स्कॉलरचा विजय
उदयनराजे भोसले यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच झाली. भारतीय प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले, त्यानंतर राज्यपाल पद भूषवलेले, प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उदयनराजेंविरोधात उमेदवारी दिली. उदयनराजे त्यांच्या स्टाईलसाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांना सिनेमाचे डायलॉग मारत कॉलर उडवताना पाहिलं आहे. त्यामुळे साताऱ्यात कॉलरचा नाही तर स्कॉलरचा विजय झाल्याचं म्हटलं जात आहे.
श्रीनिवास पाटील दोन लाख मतांच्या फरकाने जिंकतील : पृथ्वीराज चव्हाण
श्रीनिवास पाटील उदयनराजेंविरोधात तब्बल दोन लाख मतांच्या फरकाने जिंकतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात व्यक्त केला होता.
उदयनराजेंसाठी पंतप्रधान मोदींची सभा
साताऱ्यात उदयनराजेंची लोकप्रियता तुफान आहे. ते कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले तरी त्यांचा विजय निश्चित असतोच, असं कायम म्हटलं जातं. परंतु हा समज पोटनिवडणुकीत चुकीचा ठरला आहे.
सलग तीन वेळा खासदार
उदयनराजे भोसले याआधी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवड झाली होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातली राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांमध्ये उदयनराजेंचा समावेश होता. परंतु खासदार झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यातच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला.


Post a Comment

Previous Post Next Post