'आपले सबंध चांगले आहेत, ते खराब करू नका'


एएमसी मिरर : वेब न्यूज
आपले सबंध चांगले आहेत, ते खराब करू नका, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रासपच्या महादेव जानकर यांना खडसावले आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ पालम शहरात जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
गंगाखेड विधानसभा मतदार संघ शिवसेनेला सुटलेला असताना इथे रासप उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या जाहीर बंडखोरीबाबत त्यांनी गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच गुट्टे यांना उमेदवारी देणाऱ्या रासप अध्यक्ष महादेव जानकर यांना लक्ष्य केले. आम्ही यावेळी युती केली नसती तर सरकार अस्थिर राहिले असते, म्हणून युती करावी लागल्याचे ते म्हणाले. सरकारची कर्जमाफी मला पटलेली नाही. आता सरकार येऊ द्या मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे, असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.
उद्धव म्हणाले की, पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाला होता. विमा कंपनीचे दलाल पैसे घ्यायला येतात, मात्र पैसे देत नाहीत. पण त्यांना शिवसेनेने जागेवर आणत 1100 कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी द्यायला भाग पाडले. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी किती खायचे यावरही काहीतरी त्यांनी विचार करायला हवा. थोडी लाज बाळगायला हवी, अशा शब्दात त्यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली.

Post a Comment

Previous Post Next Post