दम द्यायचं काम नाही, दम देणार्‍यांना कर्जत-जामखेडने पाणी पाजलयं : राम शिंदे


एएमसी मिरर : नगर
विरोधकांवर उमेदवार आयात कराची वेळ आली आहे. 50 वर्षांचा राजकीय इतिहास असलेल्या घराण्याकडे कर्जत-जामखेडमध्ये केलेले कामही सांगायला नाही. टीका करायला मुद्दाही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आता त्यांनी दम द्यायला सुरूवातक केली आहे. कारखान्याला उस घालायचा असेल, तर मत द्या, असा प्रचार ते करत आहेत. मात्र, दम देणार्‍यांना आम्ही दुपारच्यालाच पाणी पाजतो. अनेकांना कर्जत-जामखेडने पाणी पाजलं आहे. आयात केलेले पार्सल कर्जत-जामखेडची जनताच आता निर्यात करेल, अशा शब्दांत पालकमंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहीत पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
सिध्दटेक येथे शुक्रवारी (दि.11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होेते. महाजानदेश विजय संकल्प सभेस खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार सुरेश धस, माजी मंत्री बबनराव पाचपुते, दौलत नाना शितोळे, अशोक खेडकर, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, साधना कदम, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, राजेंद्र दळवी, रवींद्र कोठारी, सुनिल साळवे, दिपक शहाणे, शांतिलाल कोपनर, राजेंद्र भैया देशमुख, प्रतिभा भैलुमे, अल्लाउद्दीन काझी, धनराज कोपनर, कांतिलाल घोडके, श्रीधर पवार, प्रकाश काका शिंदे, सुनिता खेडकर, नागनाथ जाधव, बंडा मोरे, शिवाजी अनभूले, ॲड बाळासाहेब शिंदे, चेअरमन गणेश पालवे आदी उपस्थित होते.
राम शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षात या मतदारसंघात स्वतः लक्ष घालून येथील मागण्या वेळेत पूर्ण करुन दाखविल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय. कै.आबासाहेब निंबाळकर यांच्यानंतर या मतदारसंघाला राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. त्यामाध्यमातून 60-70 वर्षांनंतर प्रथमच येथील जनतेची कामे करण्यासाठी, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. कामे करतांना हा माझा, हा तुझा, असा दुजाभाव कधीच केला नाही. कुणाशी आकसाने वागलो नाही. त्यामुळेच विक्रमी वेळेत या मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा करु शकलो. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले, तेव्हापासून पर्यटन विकासांतर्गत साडेतीन कोटींचा निधी दिला. माळढोकचे आरक्षण उठवले. तुकाई उपसा सिंचन योजना मार्गी लावली. कर्जतचा पाणीपुरवठा केला. अमरापूर ते भिगवन असा 200 कोटींचा रस्ता केला. प्रत्येक गावात रस्त्याचे डांबरीकरण केले. राशीन येथे 13.50 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मिरजगावला 10 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. अनेक मोठी कामे मार्गी लावली, असे त्यांनी सांगितले.
मतदारसंघात प्रश्न अनेक आहेत. 60-70 वर्षांचा विकासाचा अनुशेष भरुन काढायचा आहे. विरोधकांना मतदारसंघात उमेदवार आयात करावा लागला. सांगायला त्यांच्याकडे काहीच काम नाही. 50 वर्षांचा राजकीय इतिहास असलेल्या घराण्यानी या मतदारसंघात काय काम केले याची कुठलीही नोंद नाही. त्यामुळे आता उभे का राहिले? कशासाठी उभे राहिलेत? जनतेची कामे करणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्हाला कारखान्याला उस पाठवायचा असेल तर आम्हाला उस द्या, अशा पध्दतीने आता ते दम देऊन प्रचार करत आहेत. आपला कारखाना कवडीमोल किंमतीने त्यांनी घेतला. नावही बदलले आहे. त्याचे आता काय करायचे ते मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार सुजय विखे सांगतील. मात्र, 2021 पर्यंत नवीन कारखान्याची निर्मिती करुन गाळप सुरू करणार आहे, असल्याचे सांगत तशी विनंतीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. येत्या दोन वर्षात यांनी उस नेला नाही, तर त्यांचे लायसन रद्द करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे. दम द्यायचे काम कुणी करायचे नाही. कर्जत-जामखेड, नगरची ही संस्कृती नाही. दम देणार्‍यांना त्यांना आम्ही पाणी पाजतो. दमानिया गेले, कुसळकर गेले, रजनीताई पाटील गेल्या, अशा अनेकांना आम्ही पाणी पाजले आहे. त्यामुळे आता आलेलं पार्सल कसं निर्यात करायचे हेही जनतेला माहिती आहे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी या भागात एमआयडीसी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पायाभूत, मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न मी केला आहे. 460 केव्हीच्या उपके्ंरदाचे कामही सुरू केले आहे. आता कृष्णा-भीमा विलिनीकरणाचा निर्णय करत असतांना त्यात सीनाचा समावेश करावा लागणार आहे. तसे झाले तर येथील संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे सीनाचा यात समावेश करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
राजकीय कारकिर्द पणाला लावून तुकाई जशी मंजूर केली, तसे इतर प्रश्न सोडविण्यासाठी येत्या काळात काम करणार आहे. त्यासाठी आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. पाच वर्षात मोठे प्रेम, आशीर्वाद मिळाले. विरोधकांना टीका करायला काही मुद्दा सापडत नाही. विरोधी उमेदवार अनुत्तरीत झाला आहे.  मागील पाच वर्षात कार्यकर्त्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले असेल. त्यांनी मला माफ करावे. मात्र, येत्या कार्यकाळात कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा वाढविण्याचा प्राधान्याने प्रयत्न करणार आहे, असे आश्वासनही राम शिंदे यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post