सोशल धुमाकूळ : एवढंच काय.. निवडणूक आयोगही खूश..!


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सोशल मीडियात निकालाचे विश्‍लेषण करणार्‍या पोस्ट, उपरोधिक शैलीतील मेसेज चांगलेच व्हायरल झालेत. 'निवडणूक आयोगही खूश..!' या मेसेजने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
निवडणुकीचे निकाल धक्‍कादायक लागण्यास सुरुवात होताच एक्झिट पोल फोल ठरल्याने काही तरुण हातात दगड घेऊन पोलवाल्यांना शोधत असल्याचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला होता. विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. राजकीय पक्षांनी एकत्र येत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही केली होती. मात्र निकालात विरोधी पक्षांनाही चांगल्या जागा मिळाल्याने ‘आजच्या निकालाने माझी निर्दोष सुटका केली, धन्यवाद’ असे आभार मानणार्‍या ईव्हीएमचे चित्र अनेकांनी व्हायरल केले. 
‘जागा कमी झाल्या तरी, सत्ता टिकली म्हणून भाजपा खूश.., सत्तेत महत्त्व वाढलं म्हणून सेना खूश.., 25 सोडून गेले, 17 राहिले, त्यांचे पुन्हा साहेबांनी 53 केले, म्हणून राष्ट्रवादी खूश.. आणि अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे काँग्रेस खूश.., एवढंच काय, ईव्हीएमला कोणीही दोष दिला नाही, म्हणून निवडणूक आयोग खूश.. अशी निवडणूक होणे नाही!’ हा मेसेज राजकीय कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांकडूनही चांगलाच व्हायरल झाला. या मेसेजने सोशल मीडियात सर्वाधिक धुमाकूळ घातल्याचे चित्र होते.
शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव 
सोशल मीडियावर शरद पवार यांच्यावर अद्यापही कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. ‘42 पैकी 25 आमदार सोडून गेले.. राहिले फक्‍त 17 आणि त्या 17 चे केले 53.. याला म्हणतात शरद पवार’ ही पोस्ट व्हायरल होत होती. 'करायचे होते २२० पार.. मध्येच आले शरद पवार', अशा संदेशातून भाजप समर्थकांना नेटकरी टोला लगावत आहेत. सोशल मीडियातील मेसेजच्या या विनोदी फराळामुळे निवडणूक काळात सोशल मीडियात असलेले द्वेषाचे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post