एएमसी मिरर : नगर
शहरात दोन शिवसैनिकांची हत्या झाली. कशा पध्दतीने झाली हे मी विसरु शकत नाही. पण यापुढे नगर शहरामधील गुंडागिरी मोडून काढणार आहे. याद राखा यापुढे गुंडागिरी केली तर, मी आत्ता बोलणार नाही, करुन दाखवणार, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नगरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, खासदार सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.
उध्दव ठाकरे म्हणाले की, नगरची ओळख कशी असायला हवी? शिवसैनिकांची हत्या मी कदापिही विसरु शकत नाही. शिवसैनिकांवर झालेला अन्याय मी कधी खपवून घेणार नाही. मी सूडाने वागलेलो नाही. मी न्यायाने वागणार आहे. अन्याय करणार नाही, सहनही केला जाणार नाही. अन्याय झाला तर तोडून मोडून काढणार, असे ते म्हणाले. राज्यात जनतेच्या आशीर्वानाने युतीची सत्ता येणारच आहे. मात्र, त्यासाठी आमदार निवडून आणावाच लागेल. अनिलभैय्या हरले किंवा जिंकले, यापेक्षा नगरच्या अब्रूचा हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.
माजी महापौर अभिषेक कळमकरांचा सेनेत प्रवेश
बुधवारी उध्दव ठाकरेंच्या मेळाव्यात अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत जाहीर केला. उध्दव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीला आपली माणसेही जपता आली नाहीत. अभिषेक सारखी प्रेम करणारी माणसंही त्यांना कळली नाहीत, असा टोला यावेळी उध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. अभिषेक कळमकर यांनी चिंता करु नये, त्यांना बरोबर पुढे घेऊन जाऊ, असेही ते म्हणाले.
‘तुमचे भवितव्य आता माझ्या हातात’
नगरमध्ये निष्ठावान म्हणून अनिलभैय्यांना उमेदवारी दिली. अनेक जण इच्छुक होेते म्हणत, त्यांना ठाकरे यांनी सर्वांसमोर आणले. अनेक तगडे सैनिक आज बरोबर आहेत. संघटनेची पाळेमुळे रोवण्यासाठी राठोड, अंबादास पंधाडे अशांनी प्रयत्न केले. सर्व इच्छुकांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही. माझा आदेश त्यांनी मानला. ‘तुमचे भवितव्य आता माझ्या हातात आहे’, असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी न मिळालेल्यांना आश्वासित केले.
नगर शहरातले राजकारण कळलेच नाही : सुजय विखे
सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी भाषण ठोकणारे सगळे एकत्र असतात. कोण कुठे असतात, हेही मला माहिती आहेत. नगरचे राजकारण मला कधी कळलेच नाही, असे खा.सुजय विखे सांगत असतांनाच अभिषेक कळमकर व्यासपिठावर दाखल झाले. अभिषेक यांनी योग्य टायमिंग साधला. मी हेच सांगत होतो, नगरचे राजकारण मला कधी कळलेच नाही, असे विखे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
महापौरांसह काही नगरसेवक व्यासपिठावर
अनिल राठोड यांना उमेदवारी मिळाल्यापासून भाजपातील एक गट अस्वस्थ आहे. नगरसेवकही प्रचारात सक्रीय झालेले नव्हते. मात्र, शिवसेनेच्या मेळाव्यात महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक मनोज दुलम, रवींद्र बारस्कर, उदय कराळे, विलास ताठे, महिला आघाडीच्या सुरेखा विद्ये यांनी व्यासपिठावर हजेरी लावली. उपमहापौरांसह माजी खासदार दिलीप गांधी व त्यांचे समर्थक मात्र यावेळी अनुपस्थि होते.
हा वाघ पिंजर्यातून बाहेर आलाय : कळमकर
अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना दादा कळमकर यांची माफी मागितली. माझ्यावर अन्याय झाला, उमेदवारी मिळाली नाही, म्हणून मी शिवसेनेत आलेलो नाही. उध्दव ठाकरे यांच्या नेेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायची आहे. मी पिंजर्यात असतांना अनेकांनी माझ्यावर वार केले. मात्र, आता हा वाघ पिंजर्यातून बाहेर आलाय, अशा शब्दांत त्यांनी सूचक इशाराही दिला आहे.
Post a Comment