मतदार जनजागृतीसाठी पाथर्डी येथे दिव्यांगाची रॅली


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील पाथर्डी येथे मतदार जनजागृतीसाठी दिव्यांगांची रॅली काढण्यात आली होती.
शेवगाव-पाथडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग, पाथर्डी तहसील कार्यालय, पंचायत समिती, अपंग संघटना आणि दिव्यांग शाळा व त्यांच्या सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन नवीपेठेतील नाट्यगृह येथे अपंग संघटना अध्यक्ष हुमायून आतार व नाना कोटकर यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी, शाळा कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
रॅलीची कोरडगाव चौक, नाईक पुतळा ते पंचायत समिती पाथर्डी यामार्गे पंचायत समितीच्या आवारात सांगता झाली. पंचायत समिती, पाथर्डी चे पदाधिकारी खळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक व्यवहारे, कक्ष अधिकारी सचीन घोडके, अपंग संघटनेचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सहाययक गटविकास अधिकारी यांनी सर्व उपस्थित दिव्यांग मतदारांना मार्गदर्शन करून मतदानाचे आवाहन केले. तसेच ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीनचा वापर कसा करावा, याची सचित्र माहिती देऊन मार्गदर्शन केले.
पाथर्डी येथील एस.टी स्टॅण्डवर दिव्यांग मतदार सहाय्यता कक्षाचे उद्घाटन नियंत्रक पोटे यांच्या हस्ते झाले. या रॅलीमध्ये निवासी मुकबधीर विद्यालय, मोहटादेवी रोड, निवासी मतीमंद विद्यालय, मतीमंद बालगृह, मोहरी रोड, निवासी अपंग विद्यालय, चांदगाव रोड, विदयार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post