वोटर स्लीप हा मतदानासाठीचा पुरावा नाही


एएमसी मिरर : नगर 
मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. कोणत्या मतदान केंद्रावर मतदान आहे, हे माहिती होण्यासाठी मतदारांना वोटर स्लीप वाटप करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानावेळी वोटर स्लीप हा मतदानाचा पुरावा मानता येणार नाही. त्यासाठी मतदार ओळखपत्रासह भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ११ ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदारांनी सोबत बाळगणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.


विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. ज्या मतदाराकडे छायाचित्र मतदार ओळखपत्र नसेल त्यांची इतर 11 पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. असे त्यांनीकळविले आहे.
छायाचित्र मतदार ओळखपत्र नसल्यास इतर अकरा पुराव्यापैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे. यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र शासन/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, कामगार मंत्रालय यांचेकडील आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, आमदार/खासदार यांना देण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.
वरील 11 पैकी एक ओळखपत्र असल्यास मतदान करता येईल. केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी आपली ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर स्वीकारता येणार नाही. त्यासोबत ओळख पटविण्यासाठी आपले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे लागेल किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वरीलपैकी एक ओळख कागदपत्र आणावे लागेल. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post