रक्षकच झाले भक्षक; तरूणीवर सामूहिक बलात्कार


एएमसी मिरर : वेब न्यूज 
नोकरीच्या शोधात आपल्या परिचयाच्या व्यक्तीला भेटायला जात असलेल्या एक २१ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास नॉएडातील सेक्टर ६३ मधील एका पार्कमध्ये ही घटना घडली.
या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून दोन जण अद्यापही फरार असल्याची माहिती समोर आली आहे. सदर तरूणी ही नॉएडाची रहिवासी असून ती नोकरीच्या शोधात होती. यादरम्यान तिची ओळख एक्सपोर्ट कंपनीत शिपाई म्हणून काम करणाऱ्या रवी नावाच्या एका व्यक्तीशी झाली. नोकरीबद्दल बोलण्यासाठी रवीनं त्या तरूणीला एका ठिकाणी भेटायला बोलावलं. त्यानंतर त्यानं तिला जवळच्याच पार्कमध्ये नेत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरूणीनं आरडाओरडा करण्यास सुरूवात केल्यानंतर दोन जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी रवीला मारहाण केली. रवीनं घटनास्थळाहून पळ ठोकला. परंतु तरूणीला वाचवण्यासाठी आलेल्या दोन जणांनी आपल्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीनंच त्या तरूणीवर बलात्कार केला. त्यानंतर त्या तिघांनीही पळ ठोकला. आरोपींनी त्या तरूणीला पार्क जवळच असलेल्या एका ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला मारहाण केली. गुड्डू, शमू, ब्रिजकिशोर, पितांबर आणि उमेश अशी आरोपींची नावं असल्याचं सांगण्यात आलं.
या घटनेनंतर तरूणीने पोलीस ठाण्यात जाऊन याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यानंतर त्या तरूणीला त्वरित जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच तिच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या तिच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, नॉएडा पोलिसांनी फरार आरोपींची माहिती देणाऱ्यांना २५ हजारांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post