पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातात दोघे जागीच ठार


एएमसी मिरर : वेब न्यूज
पुणे-सोलापूर महामार्गावर गुरूवारी (ता.७) मध्यरात्री २.३० ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस उडविल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले असून तिसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात माढा तालुक्यातील शिराळ (टें) गावाच्या हद्दीत महामार्गावर घडला आहे. ठार व जखमी हे लातूर जिल्ह्यातील औसा येथील रहिवासी असून त्यांची अद्याप ओळख पटली नाही. ते पुण्याकडे दुचाकीवरून निघाले होते. हे तिघेही तीस ते पस्तीस वयाचे तरुण आहेत.
गुरुवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णीपासून सहा किमी अंतरावरील शिराळ (टें) गावच्या हद्दीत दुचाकीस (क्र-एम.एच.२४- बी.५२४१) अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले आहेत. तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमीस इंदापूर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. तसेच ठार झालेल्‍या दोघांचे पार्थिव टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्‍यात आले आहेत.
दरम्यान दोघे जागीच ठार झाल्याने व तिसरा गंभीर जखमी असल्याने तिघांचीही ओळख पटविणे पोलिसांना कठीण झाले आहे. तसेच त्यांच्या मोबाईलवर नातेवाईकांनी केलेल्या कॉलमुळे ते तिघे लातूर जिल्ह्यातील औसा येथील रहिवासी आहेत. तिघेही रात्री सोलापूर मार्गे पुणे येथे निघाले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचे नातेवाईक टेंभुर्णीकडे येत असून ते आल्यानंतर मयतांची ओळख पटविण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post