सात दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा


एएमसी मिरर वेब टीम 
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथील दहशतवादविरोधी विशेष न्यायालयाने आज (बुधवार) जुलै २०१६ मध्ये ढाक्यातील ‘होली आर्टिसन बेकरी’ या रेस्टॉरंटवरील हल्ल्यातील सहभागाबद्दल प्रतिबंधित असलेल्या दहशतवादी संघटनेच्या सात दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेत तारुषी जैन (वय १८) या भारतीय तरुणीसह २० परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अन्य ३० जण जखमी झाले होते.
न्यायाधीश मोजीबुर रहमान यांना जुमाटुल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेतील काहीजण हल्ल्याची योजना आखणे, बॉम्ब तयार करणे आणि खुनासह अनेक आरोपांमध्ये दोषी असल्याचे आढळले. त्यांनी याप्रकरणी अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या भरगच्च अशा न्यायालयासमोर हा निर्णय दिला.
ढाक्याच्या अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या भागात असलेले हे रेस्टॉरंट परदेशी पर्यटकांनी नेहमीच गजबजलेले होते. रात्रीही रेस्टॉरंटमध्ये गर्दी असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला चढवत सर्वाना ओलीस ठेवले होते. य़ा हल्ल्यात मृत्यू झालेले भारतीय तरूणी तारुषी हिला प्रथम पालकांना दूरध्वनी करण्यास अतिरेक्यांनी सांगितले होते, मात्र नंतर तिची हत्या केली गेली. अतिरेक्यांनी अत्यंत निर्दयीपणे या २० जणांची हत्या केली होती. मृतांमध्ये तारुषी वगळता अन्य सर्वजण इटली आणि जपानचे नागरिक होते. चकमकीत दोन पोलीस अधिकारीही मारले गेले होते. यावेळी दहशतवादी आणि पोलिसांध्ये सुरू असलेली चकमक पोलिसांच्या आटोक्याबाहेर जाऊ लागताच लष्कराच्या कमांडो पथकाने धडक कारवाई सुरू करत १३ मिनिटांत सर्व दहशताद्यांचा खात्मा केला होता. रात्री सुरू झालेली ही कारवाई सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी तब्बल १३ तासानंतर पूर्ण झाली होती.
लष्कराने मोहीम यशस्वी केल्याची तसेच १३ ओलिसांना वाचविण्यात यश आल्याची माहिती पंतप्रधान शेख हसिना यांनी माध्यमांद्वारे दिली होती. हे अत्यंत क्रूर कृत्य असून रमझानच्या महिन्यात हे कृत्य करणारे हे कसले मुसलमान आहेत? दहशतवाद हाच केवळ त्यांचा धर्म आहे, अशी टीकाही देखील त्यांनी केली होती. एकाही अतिरेक्याला पळ काढण्यात यश न आल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post