आदित्य ठाकरेंनी शपथविधीसाठी सोनिया, मनमोहन सिंग यांना दिले निमंत्रण


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्कवर दिमाखदार सोहळ्यात हा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, आघाडीत महत्वाची भुमिका निभावणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या शपथविधीला हजर राहणार नसल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आणि त्यांनी शपथविधीसाठी सोनिया गांधी यांना वैयक्तिकरित्या निमंत्रण दिले आहे.
दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीबरोबरच माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंग यांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना त्यांनी उद्याच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रणही दिले. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल झाले होते.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे मी त्यांची भेट घेतली. त्यानंतर आता मी पुन्हा मुंबईकडे रवाना होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post