सोनिया गांधी, शरद पवारांच्या भेटीनंतर मंगळवारी सत्तास्थापनेबाबत निर्णय


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांची उद्या (सोमवार) भेट होणार आहे. त्यानंतर परवा (मंगळवारी) पुन्हा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन सत्तास्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात रविवारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मलिक यांनी ही माहिती दिली.
मलिक म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि एकूणच परिस्थितीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी राज्यातील राष्ट्रपती राजवट संपवून लवकरात लवकर पर्यायी सरकार स्थापन करावे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. मात्र, काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी असल्याने आम्ही ठरवल्याप्रमाणे काँग्रेससोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहोत.”
“उद्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भेटणार आहेत त्यावेळी त्यांच्या यासंदर्भात चर्चा होईल. त्यानंतर मंगळवारी पुन्हा राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल त्यानंतर पुढे काय करायचंय याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल,” असे नवाब मलिक म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post