शिवसेनेने केंद्रातील एनडीए सरकारमधूनही बाहेर पडायला हवं : नवाब मलिक


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात सत्ता स्थापन करण्यास भाजपाकडून राज्यपालांची भेट घेऊन असमर्थता दर्शवण्यात आल्यानंतर आता नव्या राजकीय समीकरणांनी जोर धरला आहे. भाजपानंतर दुसऱ्या क्रमांचा मोठा पक्ष असेलेल्या शिवेसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र स्वबळावर सत्ता स्थापन करणे शिवसेनेला शक्य नसल्याने अशा परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पक्षाची सध्याची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेने अशा परिस्थिती भाजपाशी नातं तोडायला हवं व केंद्रातील एनडीए सरकारमधूनही बाहेर पडायला हवं, असं माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी सांगितले की, सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर आमचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, १२ नोव्हेंबर रोजी आमदारांची बैठक होणार आहे. ही जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, यावर निश्चितपणे आमदारांच्या बैठकीत खुली चर्चा होणार आहे. यानंतर आमचा निर्णय होईल. आता भाजापाने असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे आता राज्यपाल कोणाला बोलावतात याकडे आमचे लक्ष आहे. जर शिवसेनेला सत्ता स्थापन करायची असेल किंवा ज्या पद्धतीने संजय राऊत सांगत आहेत की, आमचाच मुख्यमंत्री होईल. अशावेळी भाजपा त्याला पाठिंबा देणार आहे का? हे पण आता स्पष्ट होत नाही. कुठतरी शिवसेनेने भाजपाशी नातं तोडलं पाहिजे. केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी रीतसर प्रस्ताव दिल्यावर आम्ही त्याच्यावर विचार करू. एखादं सरकार स्थापन करत असताना एक दिवसात त्यावर निर्णय होत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post