तेव्हाच शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण होईल : आदित्य ठाकरे


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : आज (बुधवार) सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पडला. यावेळी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील शपथ घेतली. त्यांच्या रुपात ठाकरे घराण्यामधील पहिला व्यक्ती आज विधानभवनात आमदार म्हणून पोहचला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खरोखर कधी पूर्ण होईल, याबद्दलही त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
विधानभवानात मी या अगोदर वेगवेगळे विषय घेऊन अनेकदा आलेलो आहे. कधी विधानभवनाचे सत्र पाहायला यायचो, तर कधी मंत्र्यांच्या भेटीसाठी आलो. मात्र आज मी या ठिकाणी एक आमदार म्हणून आलो आहे. यासाठी मी महाराष्ट्रातील जनेतेचे आभार व्यक्त करतो, असे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, जेव्हा दुष्काळमुक्त, कर्जमुक्त, प्रदूषणमुक्त आणि बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र आम्ही करू. तेव्हाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांचेही आभार व्यक्त केले. मंत्रिमंडळाबाबत तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. युवा म्हणून काम करताना आपलं सहकार्य आवश्यक आहे. दिवसातल्या घडामोडी कळवत राहू. पहिल्यांदा या ठिकाणी आलो आहे. चांगलं वाटत आहे. युवा आमदारांबरोबर काम करताना मजा येईल. महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांचे, महिलांचे अनेक मुद्दे आहेत त्यासाठी काम करायच आहे. यासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे. आम्ही महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्यास निघालो आहोत. नवा महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सर्वच पक्षांबरोबर आम्हाला काम करायचे आहे कारण, महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. तसेच, निवडणुकीच्या काळात असेलेले मतभेद विसरून सर्वांनीच एकजुटीने काम करावं, असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post