महापौर आरक्षणामुळे ‘भाजप’ची मोठी अडचण!


एएमसी मिरर : नगर 
महापौर पदासाठी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गाला संधी मिळाली आहे. मात्र, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील एकही महिला नगरसेविका नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. पुढील अडीच वर्षे त्यांना महापौर पदालाही मुकावे लागणार आहे.
राज्यातील महापालिकांच्या महापौर पदासाठी आज (दि.13) मुंबईत सोडत काढण्यात आली. यात नगर शहराचे महापौर पद पुढील अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात या प्रवर्गाला प्रथमच संधी मिळाली आहे. मनपात सध्या शिवसेनेचे 24, ‘भाजप’चे 14, राष्ट्रवादी काँग्रेसचे 18, काँग्रेसचे 5, ‘बसपा’चे 4, ‘सपा’चा 1 व 3 अपक्ष असे 68 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जाती महिला या प्रवर्गातील केवळ 5 सदस्य सभागृहात आहे. त्यामुळे आगामी अडीच वर्षांच्या कार्यकाळात या पाचपैकी एकालाच महापौर पदावर विराजमान होण्याची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. पाच सदस्यांपैकी शिवसेनेची तीन सदस्य असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. भारतीय जनता पक्षाकडे अनुसूचित जाती प्रवर्गात एकही महिला नगरसेविका नसल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
दरम्यान, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ‘भाजप’च्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. तर शिवसेनेच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेनेत अनुसूचित जाती महिला या प्रवर्गात तीन नगरसेविका आहेत. त्यातील एकाला पुढील अडीच वर्षांसाठी महापौर पदावर संधी मिळण्याची शक्यता आहे.

या पाच जणांपैकी एकाला मिळू शकते संधी!
अनुसूचित जाती महिला या प्रवर्गात निवडून आलेले पाच सदस्य सध्या सभागृहात आहेत. त्यांच्यापैकी एकाला पुढील अडीच वर्षासाठी महापौर पदावर संधी मिळणार आहे. यात शिवसेनेच्या गटनेत्या व नगरसेविका रोहिणी शेंडगे, रिता भाकरे, शांताबाई शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पारगे व काँग्रेसच्या शीला चव्हाण यांचा समावेश आहे.

आजपर्यंतचे महापौर, आरक्षण व कालावधी
नागरिकांचा मागास प्रवर्ग - भगवान फुलसौंदर (1.1.2004 ते 30.6.2006), सर्वसाधारण - संदीप कोतकर (1.7.2006 ते 31.12.2008), नागरिकांचा मागास प्रवर्ग - संग्राम जगताप (1.1.2009 ते 30.6.2011), सर्वसाधारण महिला - शीला शिंदे (1.7.2011 ते 31.12.2013), सर्वसाधारण - संग्राम जगताप (1.1.2014 ते 27.5.2015), अभिषेक कळमकर (8.6.2015 ते 30.6.2016), सर्वसाधारण महिला - सुरेखा कदम (1.7.2016 ते 31.12.2018), सर्वसाधारण - बाबासाहेब वाकळे (1.1.2019 ते 30.6.2021).

Post a Comment

Previous Post Next Post