नगर : मनपा पाणी योजनेच्या मुदतवाढीसाठी प्रस्ताव


एएमसी मिरर : नगर
महापालिकेमार्फत राबविल्या जात असलेल्या ‘अमृत’च्या पाणी योजनेचे 40 टक्के कामे पूर्ण झाले आहे. काम सुरू असले तरी निविदेची मुदत संपुष्टात आली असून, मुदतवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच शेतकर्‍यांच्या जागांच्या अडचणींबाबत मार्ग काढण्याचे निर्देश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले आहेत. त्यानुसार मनपाचे अधिकारी आज (दि.5) प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकर्‍यांची चर्चा करणार आहेत.
अमृत अभियानांतर्गत कामे सुरू असलेल्या भुयार गटार योजना व पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा महापौर वाळे यांनी सोमवारी (दि.4) आढावा घेतला. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती सुवर्णा गेणप्पा, उपायुक्त प्रदीप पठारे, अजय चितळे,संजय ढोणे, शहर अभियंता विलास सोनटक्के, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभागप्रमुख महादेव काकडे, एमजीपीचे कार्यकारी अभियंता श्री. सराफ, अभियंता श्री गणेश गाडळकर, सदाशिव रोहोकले, मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, उपअभियंता अजय मुळे, शोनचे इंजिनिअरींगचे दयानंद पानसे, ड्रीम कन्स्ट्रक्शनचे पवन भावसार आदी उपस्थित होते.
मुळानगर येथील टाकीपासून (डीपीटी) ते विळद व विळद ते वसंत टेकडीपर्यंत मुख्य जलवाहिनीचे 27 किलोमीटरचे योजनेतील मोठे काम प्रलंबित आहे. या कामात शेतकर्‍यांच्या जागांचे अडथळे आहेत. काही ठिकाणी हॉटेल, शेड, इमारतींची बांधकामे आहेत. या संदर्भात संबंधितांशी चर्चा करुन तातडीने मार्ग काढावा असे निर्देश महापौर वाकळे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार मनपाचे अधिकारी, अभियंता व ठेकेदार संस्थेचे प्रतिनिधी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. ज्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध असेल, त्यादृष्टीने काम केले जाणार आहे. जिथे अडचण नाही, अशा ठिकाणी पाईप अंथरण्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे निर्देश महापौरांनी दिले आहेत.
दरम्यान, भुयारी गटार योजनेच्या कामालाही गती देण्याचे आदेश महापौर वाकळे यांनी दिले आहेत. जादा रुंदीचे पाईप वापरण्याबाबत प्रस्ताव करुन त्यानुसार काम करावे, असेही त्यांनी सांगितले आहे.

जलशुध्दीकरण केंद्रांच्या कामाला वेग
अमृत पाणी योजनेअंतर्गत तीन जलशुध्दीकरण केंद्रांची दुरुस्ती करण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. तर विळद येथे 45 एमएलडी क्षमतेच्या नवीन केंद्राचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. वसंतटेकडी येथील पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर असून, स्लॅबचे काम सुरु झाले आहे. योजनेचे सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post