अहमदनगर : तरुणीवर चालकाकडून वाहनामध्येच अत्याचार


एएमसी मिरर : अहमदनगर
बाहेरगावाहून नोकरीनिमित्त अहमदनगर शहरात खासगी वाहनाने येणार्‍या 21 वर्षीय तरुणीवर खासगी वाहनचालकाने गाडीतच अत्याचार केल्याची संतापजनक घटना अहमदनगर शहरातील स्टेशनरोडवर क्लेरा ब्रुस मैदानाच्या जवळ मंगळवारी (दि.19) रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.
नगर तालुक्यातील टाकळी काझी परिसरातील एक 21 वर्षीय तरुणी नगरमध्ये नोकरीकरीता खासगी वाहनाने चार महिन्यांपासून येते. मंगळवारी तिला रात्रीची ड्युटी असल्याने संध्याकाळी 7 वाजता राहत्या घरातून आईसोबत नगरला नोकरीवर जाण्यासाठी जामखेड-नगर रोडवर आली व जामखेडहून नगरकडे जाणार्‍या वाहनाला तिने हात करुन थांबविले व तुम्ही नगरला जात आहात का असे विचारले. त्यावर त्याने नगरला जात असून तुम्हाला नगरला सोडतो असे म्हणाला. यावर सदर तरुणीने आईचा निरोप घेऊन गाडीत बसली. त्यावेळी गाडीमध्ये चालकाशिवाय अन्य कोणीही नव्हते. रस्त्याने येताना वाहनचालकाने तरुणीशी बोलून तिची जुजबी माहिती घेतली व तो स्वत: एमआयडीसी नगर येथे रहात असल्याचे सांगितले. गाडीमधून ते स्टेशनरोडवरील पाटील हॉस्पिटलजवळ आले असता त्याने तिला उतरण्याकरीता गाडी क्लेरा ब्रुस मैदानाजवळ रस्त्याच्या कडेला उभी केली व अचानकपणे गाडीचे सर्व दरवाजे लावून घेतले. काचा लावून घेतल्या व तिच्याशी अंगलट करुन जबरदस्तीने तिच्यावर अत्त्याचार केला. त्यावेळी तरुणीने आरडा-ओरडा केला परंतू गाडीच्या काचा बंद असल्याने तसेच हायवेवरच्या गाड्यांचा मोठा आवाज असल्याने तिचा आवाज कोणालाही ऐकू गेला नाही. त्यानंतर त्याने तिचा मोबाईल नंबर घेऊन माझ्याशी संपर्क ठेवायचा, नाहीतर मी तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर तो निघून गेला. या घटनेबाबत सदर तरुणीने आईला सांगितले. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सदर तरुणीच्या फिर्यादीवरुन अनोळखी वाहनचालकाविरुद्ध भा.दं. वि. कलम 376 प्रमाणे बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भंगाळे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post