अहमदनगर : घरकुलातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात!


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : महापालिकेने बांधून दिलेल्या अहमदनगर शहरातील काटवन खंडोबा रस्त्यावरील घरकूल योजनेच्या परिसरात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चेंबर फुटून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर वाहात आहे. मनपाकडे निवेदन देऊनही जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
घरकूल योजनेत सुमारे पाचशेहून अधिक नागरीक वास्तव्यास आहेत. तेथील कचर्‍यासह गटारी तुंबणे, चेंबर फुटणे आदी विविध समस्यांनी नागरीक त्रस्त आहेत. यापूर्वीही नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. मात्र, तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. घरकूल योजनेतील ड्रेनेज लाईन व सांडपाणी शेजारील प्लॉटवरच सोडून देण्यात आलेले आहे. या लाईनही तुंबलेल्या असल्याने चेंबर फुटून मैलामिश्रित पाणी अंतर्गत रस्त्यांवर वाहात आहे. तेथील नागरिकांनी मागील आठवड्यात पुन्हा एकदा मनपाला निवेदन दिले. आयुक्त, महापौरांना ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. नागरिकांच्या घरासमोर मैलामिश्रित पाणी वाहात असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तेथील रहिवाश्यांनी दिलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post