मनपा अधिकाऱ्यांना मनमानी महागात पडेल : आमदार जगताप


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : कचरा, मोकाट जनावरे, बंद पथदिवे, मोकाट कुत्री अशा नागरी प्रश्नांबाबत सोडवणुकीसाठी महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे व मनमानी करणे अधिकाऱ्यांना महागात पडेल. यापुढे मनमानीपणा चालणार नाही, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी महापालिकेत आंदोलनाचा इशाराही त्यांनी आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.
शहरात स्वच्छता व दैनंदिन सुविधांचा अभाव आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते अस्वच्छ आहेत, अनेक वसाहतींतून रस्त्यावर पडणारा कचरा उचलला जात नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हे ढीग लवकर उचलले जात नसल्याने त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत साथीचे आजार पसरून त्यामुळे त्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी मोकाट जनावरे फिरताना व रस्त्याच्या मध्ये बसलेली दिसतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अपघातही होत आहेत. शहर व उपनगरातील ८० टक्के पथदिवे बंद आहेत. या विभागाचे कामकाज पाहण्यासाठी सक्षम अधिकारी नाहीत. मोकाट कुत्र्यांचीही समस्या मोठी आहे. शहरात फिरताना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत यापूर्वी चर्चा केली होती. मात्र, याबाबत कार्यवाही झाली नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडू शकते व अधिकाऱ्यांचा असा मनमानीपणा यापुढे चालणार नाही. समस्यांबाबत तातडीने उपाययोजना महापालिकेने केल्या नाही, तर येत्या मंगळवारी (२६ नोव्हेंबर) महापालिकेत आयुक्तांच्या दालनात नागरिकांसमवेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post