'नगरच्या अतिक्रमणांची गिनीज बुकात नोंद करावी'


एएमसी मिरर : नगर
नगर शहरात महापालिका स्थापन झाल्यानंतर गेल्या 16 वर्षात अंदाजे 1600 पेक्षा जास्तवेळा अतिक्रमण हटाव मोहिमा राबवूनही अतिक्रमणे ‘जैसे थे’ च असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हा एक जागतिक विक्रम झाला आहे. त्यामुळे नगरच्या अतिक्रमणांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घ्यावी असे पत्र मनसे विद्यार्थी सेनेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे भारत, श्रीलंका व मालदिव विभागाचे कार्यकारी अधिकारी निखिल शुक्ला यांना पाठविले आहे.

मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे की, नगरमध्ये 2003 मध्ये महापालिका स्थापन झाली. त्यास 16 वर्ष झाले आहेत. त्यानिमित्ताने एका आगळ्या-वेगळ्या विक्रमाची नोंद गिनीज बुकात होणे आवश्यक आहे. तो विक्रम म्हणजे महापालिकेतील अतिक्रमण विरोधी विभागाच्या झोलझपाट कारवाईचा. महापालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत 16 वर्षामध्ये अतिक्रमण विरोधी विभागाने अंदाजे 1600 पेक्षा जास्त वेळा धडक मोहिम राबविल्या. मात्र तरीही अद्यापपर्यंत अतिक्रमणे जैसे थेच आहेत. उलट त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नगर महापालिकेत किती कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत याची महती संपुर्ण जगाला कळणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपल्या पथकाने नगर महापालिकेला भेट देऊन कामकाजाची पाहणी करावी व या विक्रमाची नोंद गिनीज बुकात करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
महापालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांनी कायदेशिर असलेले आणि महापालिकेच्या मालकीचे असलेले नेहरु मार्केट, दिल्लीगेटजवळील गाळे, तोफखान्यातील शरण मार्केट पाडून तेथील गाळेधारकांना देशोधडीला लावले. त्यांना व अन्य व्यावसायिकांना कायदेशिर व्यवसाय करण्याऐवजी रस्त्यावर अतिक्रमणे करुन बेकायदेशिरपणे व्यवसाय करण्यास भाग पाडले आहे. या कामात केवळ अधिकारीच नव्हे तर आजपर्यंतचे पदाधिकारी, नगरसेवक यांचाही मोलाचा सहभाग आहे. आजपर्यंत नगरमध्ये आलेल्या एकाही आयुक्ताने याचा जाब कोणाला विचारला नाही. हाही एक विक्रमच आहे. त्यामुळे या आगळ्या-वेगळ्या विक्रमाची नोंद होणे गरजेचे आहे. त्यामुळे नगर शहराची अनोखी महती जगाला कळून जगातील लोक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी नगरला येण्याऐवजी नगरमधील अतिक्रमणे पाहण्यासाठी आवर्जुन येतील, असा उपरोधीक टोलाही सुमित वर्मा यांनी लगावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post