अहमदनगर : मनपा रक्तपेढीतील आर्थिक अपहार बारा वर्षांनंतर सिध्द


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महापालिकेच्या रक्तपेढीमध्ये सवलत पत्रांच्या आधारे करण्यात आलेला 27 हजार 450 रुपयांचा अपहार तब्बल 12 वर्षांनंतर सिध्द झाला आहे. अपहार प्रकरणी ठपका ठेवण्यात आलेले लिपीक राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधातील चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून, महापालिका आयुक्त याबाबत काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे. 2007 मध्ये हा अपहार झाल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
सन 2006 व 2007 मध्ये अहमदनगर महापालिकेच्या रक्तपेढीमार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरानंतर लिपीक गायकवाड यांनी 183 कार्डांपैकी 3 कार्डांचा गैरवापर केल्याचा व उर्वरीत 180 कार्ड स्वतः जवळ ठेवले होते. या माध्यमातून त्यांनी रजिस्टरमध्ये खाडाखोड करुन 27 हजार 450 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच या विभागातून बदली झाल्यानंतर कार्यमुक्त होण्यापूर्वी रितसर चार्ज न सोपविता महिला लॅब टेक्निशियनशी गैरवर्तन केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी 27 सप्टेंबर 2007 रोजी गायकवाड यांना निलंबित करुन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती.
तब्बल 12 वर्षांनंतर ही चौकशी पूर्ण झाली असून, काही दिवसांपूर्वीच या चौकशीचा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करण्यात आला आहे. वरीष्ठ लिपीक पी. एस. वायाळ यांनी गायकवाड यांच्या विरोधात आरोपपत्र सादर केले होते. त्यावर प्रभारी कामगार अधिकारी दिगंबर कोंडा यांच्या समोर चौकशी पार पडली. गायकवाड यांनी कारणे दाखवा नोटिसीला खुलासा सादर केलेला नाही, रक्तपेढीतील रजिस्टरमध्ये खाडाखोड केली, 180 सवलत पत्रांचा गैरवापर करुन 27 हजार 450 रुपयांचा अपहार केला, महिला लॅब टेक्निशियनशी गैरवर्तन केले, अशा विविध पाच मुद्द्यांवर ही चौकशी पार पडली.
चौकशी दरम्यान गायकवाड यांनी वरीष्ठांचा अवमान करुन खुलासा नोटिसीला उत्तर दिलेले नसल्याचे व रक्तपेढीतील रजिस्टरमध्ये खाडाखोड केल्याचे पुराव्यानिशी सिध्द झाले आहे. तसेच सवलत पत्रे जमा न करता त्या माध्यमातून 27 हजार 450 रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचेही चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. बदली झाल्यानंतर पदाचा चार्ज न सोपविता महिला लॅब टेक्निशियनशी गैरवर्तन केल्याचा आरोपही सिध्द करण्यात आला आहे. त्यासाठी काही कर्मचार्‍यांचे जबाबही नोंदविण्यात आलेले असून आरोप सिध्द झाल्याचा अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
कामगार अधिकार्‍यांसमोर तब्बल 12 वर्षांनंतर चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यात लिपीक गायकवाड यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सिध्द झाल्याचे नमूद करण्यात आले असल्याने त्यांच्यावर आता काय कारवाई केली जाणार? याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post