अहमदनगर : सावेडी कचरा डेपोच्या जागेवर स्मशानभूमी, उद्यानाचा प्रस्ताव


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : सावेडी कचरा डेपो तत्काळ बंद करुन या जागेवर स्मशानभूमी व उद्यान उभारण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापौरांकडे सादर करण्यात आला आहे. डेपो बंद करण्याचे आश्वासन यापूर्वीच देण्यात आलेले असून, याबाबत तातडीने महासभेसमोर प्रस्ताव मांडण्यात यावा, अशी मागणीही अहमदनगर महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संपत बारस्कर यांनी केली आहे.
उपनगर परिसरातील नागरिक कचरा डेपोमुळे हैराण झाले आहेत. परिसरातील नागरिकांचे आरोग्य या डेपोमुळे धोक्यात आलेले आहे. वास्तविक कचरा डेपो अहमदनगर शहरापासून 15 ते 20 किलोमीटर दूर असणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्त व महापौरांकडे पाठपुरावा करुन वेळोवेळी ही बाब निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे. आयुक्तांनीही कचरा डेपो बंद करुन इतरत्र हलविण्याचे आश्वासन यापूर्वीच दिलेले आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही याबाबत प्रशासनाला पत्र देऊन सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे सदरचा डेपो तत्काळ बंद करावा, अशी मागणी बारस्कर यांनी केली आहे.
स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सावेडी कचरा डेपो हटवून या जागेवर स्मशानभूमी केल्यास हा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे स्मशानभूमी व उद्यान उभारण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावेत. याबाबतचा प्रस्ताव तातडीने महासभेसमोर प्रस्ताव घेण्यात यावा, असेही बारस्कर यांनी निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post