निवडणूक खर्चातही आमदार जगतापांची आघाडी


एएमसी मिरर वेब टीम  
अहमदनगर : २२५ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व 12 उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला आहे. जिल्हा निवडणूक विभागाने या उमेदवारांचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टवरही टाकला आहे. निवडणूक प्रचारासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सर्वाधिक 17 लाख 40 हजार 946 रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होऊन 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला. निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला 28 लाखांपर्यंत निवडणूक खर्च करण्याास आयोगाने मुभा दिली होती. 23 नोव्हेंबरपर्यंत विहित नमुन्यात अंतिम खर्च सादर करणे उमेदवारांना बंधनकारक होते.
आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह सर्व उमेदवारांनी 19 नोव्हेंबरलाच अंतिम खर्च सादर केला आहे. आमदार जगताप यांचा निवडणुकीत 17 लाख 40 हजार 946 रुपये इतका खर्च झाला असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. त्या खालोखाल शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी 13 लाख 78 हजार 435 रुपये खर्च केले आहेत. अपक्ष उमेदवार सचिन राठोड यांचा निवडणूक खर्च सर्वात कमी 11 हजार 150 रुपये इतका झाला आहे.
उमेदवारांनी सादर केलेला खर्च निवडणूक खर्च निरीक्षक नागेंद्र दीक्षित यांच्या समोर मांडण्यात आला. त्यांनी सर्व उमेदवारांच्या खर्चास मान्यता दिली आहे. खर्च निरीक्षक नागेंद्र दीक्षित, जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मंजुरीने या उमेदवारांचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टवर 22 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आला आहे.

उमेदवार आणि खर्च (रुपये)
अनिल राठोड 13,78,758, बहिरनाथ वाकळे 2,44,936, श्रीपाद छिंदम 1,66,011, संग्राम जगताप 17,40,946,  संतोष वाकळे 3,12,873,   किरण काळे  1,87,072, मीर असिफ सुलतान  2,70,118, प्रतिक  बारसे  43,280,  श्रीधर दरेकर 1,70,748, सचिन राठोड 11,150,  सुनील फुलसौंदर 17,050, संदीप सकट 31,176.

Post a Comment

Previous Post Next Post