अहमदनगर : सीनेवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : सीना नदीवर लोखंडी पुलाशेजारी नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी अहमदनगरचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या आठवडाभरात काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. उद्घाटन व लोकार्पणाच्या कार्यक्रमाचेही नियोजन सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे.
लोखंडी पुलावरील अवजड वाहतूक बंद झाल्यानंतर त्या शेजारील छोट्या पुलावरुन ही वाहतूक सुरू झाली. मात्र, सदरचा पूल अनेक वर्षांपूर्वीचा असल्याने त्याची दुरवस्था झाली होती. अहमदनगर महापालिकेने या ठिकाणी नवीन पुलाचे काम 2010-2011 मध्ये मंजूर केले होते. या पुलाच्या कामासाठी 6.32 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दलित वस्ती सुधार योजनेतून या कामासाठी मनपाने 1.80 कोटी रुपये वर्ग केले होते. मात्र, त्या व्यतिरिक्त निधी उपलब्ध नसल्याने काम रखडले होते. मागील दोन-तीन वर्षांपासून या कामाला वेग देण्यात आला. दलित वस्ती सुधार योजनेसह इतर निधीतूनही या पुलाच्या कामासाठी 2 ते 2.50 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. तसेच मनपाकडे उपलब्ध असलेल्या शासकीय निधीतील व्याजाच्या रकमेतून पुन्हा या पुलाच्या कामासाठी दीड कोटी रुपये उपलब्ध झाल्यामुळे पुलाच्या कामाला गती मिळाली.
वर्षानुवर्षे काम संथगतीने सुरू असल्याने महापौर वाकळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सदरच्या पुलाचे काम सहा महिन्यांत मार्गी लावण्याचे आदेश ठेकेदार संस्थेला दिले होते. वारंवार बैठका घेवून व प्रत्यक्ष जागेवरील अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना झाल्यामुळे या कामाला गती मिळाली. सद्यस्थितीत काम अंतिम टप्प्यात आले असून, पुलावर डांबरीकरणाचे कामही सुरू झाले आहे. पुलाच्या जोडरस्त्यांसाठी भराव टाकण्यात आलेला आहे. त्यावर येत्या दोन-तीन दिवसांत ग्राऊटिंग केले जाणार आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या निवृत्तीपूर्वी लोकार्पणाचा कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post